कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी पल्लवीला ताब्यात घेण्यात आलं आहे. बंगळुरुमधील आपल्या निवासस्थानी ओम प्रकाश यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. पल्लवीला ओम प्रकाश आपल्यावर विषप्रयोग करत असल्याची शंका होती. तसंच आपल्या घरात बंदी ठेवल्याची आणि आपल्या माणसांच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात असल्याचाही संशय होता.
ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी ज्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये सहभागी होती, त्या ग्रुपवर पाठवलेले मेसेज समोर आले आहे. तपासात दिसून आलं आहे की, पल्लवीला स्किझोफ्रेनिया आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. तिच्या मुलानेही पोलीस तक्रारीत ती नैराश्याने ग्रस्त होती असं सांगितलं आहे. त्यामुळे हे मेसेज प्रत्यक्षात गांभीर्याने घेणं फार अवघड आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या एका ग्रुपमध्ये पाठवलेल्या मेसेजमध्ये तिने आपले पती, 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, विरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तिने म्हटलं आहे की, ओम प्रकाश यांची रिव्हॉल्व्हर ताबडतोब जप्त केली पाहिजे. "मी एक ओलीस आहे. मी जिथे जाते तिथे नेहमीच ओमप्रकाशच्या एजंटांच्या देखरेखीखाली असते," असा दावा तिने केला होता.
तिने असाही आरोप केला की 68 वर्षीय माजी उच्चपदस्थ पोलिस अधिकारी तिला विष देत होते. "मी त्यांना वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास सांगत आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी जिथे स्वतः जाते तिथे विषबाधा सुरू होते," असा आरोप तिने केला आहे. तिने म्हटलं आहे की, "ओम प्रकाश तिच्या अन्नात विष मिसळण्यासाठी मोलकरणीची मदत घेत असे. ते आपली मुलगी कृतीलाही त्रास होत होते आणि ती "शांत बसू शकत नव्हती".
कृतीलाही तिच्या आईसोबत ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पोलीस आता तिच्या वडिलांच्या हत्येत काही सहभाग आहे का? याचा तपास करत आहेत.
एका मेसेजमध्ये पल्लवीने लिहिलं आहे की, पतीच्या निर्देशानुसार फूड डिलिव्हरीतही भेसळ केली जात होती. "पैसा सर्वकाही सहज बनवतो. सत्ता तुम्हाला भ्रष्ट बनवते," असं तिने लिहिलं आहे. "मी काय करु? माझ्या मुलीलाही त्रास होत आहे. तिने आवाज वाढवायला सुरुवात केल्यापासून तिलाही त्रास दिला जात आहे," असा आरोप तिने केला.
पल्लवीने असंही लिहिले की जर तिला किंवा कृतीला काही झालं आणि ते कितीही नैसर्गिक किंवा अपघाती वाटलं तरी, ओम प्रकाश जबाबदार असतील. तिने असेही म्हटले की ती "तूप आणि लिंबू वापरून स्वतःला आणि तिच्या मुलीला डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करत होती. "देवाच्या कृपेने, मी प्रत्येक वेळी स्वतःला डिटॉक्स करू शकले आहे," असं तिने एका मेसेजमध्ये लिहिले. पल्लवीने इतर आयपीएस अधिकाऱ्यांना तसंच सध्याच्या डीजीपींना तिच्यासाठी पर्यायी निवासस्थान शोधण्यास सांगण्यास सांगितलं होतं.
एकदा आपण रस्त्यावरुन चालत घरी जात असताना कोणतरी गाडीतून कसली तरी पावडर आपल्या अंगावर टाकली. मला सुरुवातीला लक्षात आलं नाही. पण नंतर जळजळ होत होती असंही पल्लवीने लिहिलं आहे.
कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात दिसून आलं आहे की ओम प्रकाश यांचं त्यांनी पत्नी पल्लवीसह कुटुंबातील एका सदस्याला हस्तांतरित केलेल्या काही स्थावर मालमत्तेवरून वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने आधी त्यांच्यावर मिरची पावडर फेकली आणि बांधून ठेवत हत्या केली. 68 वर्षीय पोलीस आयुक्तांची हत्या करण्यासाठी ग्लास बॉटलचाही वापर करण्यात आला.
हत्या केल्यानंतर पल्लवीने आपल्या शेजाऱ्याला फोन केला आणि हत्या केल्याची कबुली दिली असं समजत आहे. मी राक्षसाला ठार केलं आहे असं तिने व्हिडीओ कॉल करुन सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश आणि पल्लवी यांच्यात रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास भांडण झालं. यानंतर पल्लवीने मिरची पावडर टाकून ओम प्रकाश यांचे हात पाय बांधले. यानंतर तिने एकामागोमाग अनेक वेळा चाकूने वार केले.