काँग्रेसला धक्का, गोव्यातले २ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिलाय.

Updated: Oct 16, 2018, 04:15 PM IST
काँग्रेसला धक्का, गोव्यातले २ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार title=

नवी दिल्ली : गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिलाय. संध्याकाळी पाच वाजता त्यांचा भाजपामध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी भाजपात प्रवेश घेण्याचं निश्चित केलंय. दरम्यान, विश्वजित राणे आणि विनय तेंडुलकर दिल्लीत दाखल झाले असून त्यांची पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरू झालीय. सोपटे आणि शिरोडकर यांचे राजीनामे प्राप्त झाले असून सभागृहाचं संख्याबळ ३८ वर गेल्याची माहिती गोव्याचे विधानसभा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलीय.

गोव्याची विधानसभा सदस्य संख्या ४० आहे पण काँग्रेसच्या २ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे ही संख्या ३८ झाली आहे. तसंच २ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची संख्या १६ वरून १४वर आली आहे. गोव्यामध्ये आता भाजप १४, काँग्रेस १४, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३, गोवा फॉरवर्ड ३, अपक्ष ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आमदार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे गोव्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला होता. काँग्रेसकडून गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु होते. पण आता काँग्रेस आणि भाजप आमदारांची संख्या गोव्यात समसमान झाल्यामुळे काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यात अडचण निर्माण झाली आहे.