Gold Rate Today: भारतीय शेयर बाजारात आलेल्या तेजीनंतर सोन्याच्या किंमतीत घसरण होत असल्याचे पाहायला मिळतेय. MCX वर सोनं प्रति 10 ग्रॅमने 87,734 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. तर, चांदीच्या किंमतीत आज तेजी पाहायला मिळत आहे. चांदी प्रति किलो 336 रुपयांनी वाढून 98,220 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे.
डॉलरमध्ये होणारी घसरण आणि नफावसुलीमुळं सोनं आणि चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 3,050 डॉलरवर स्थिरावले होते तर चांदी 1.5 टक्क्यांनी घसरून 34 डॉलरवर स्थिरावली होती. सराफा बाजारात सोनं 900 रुपयांनी घसरून 87,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदी 1,500 रुपयांनी घसरून 97,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. कच्चा तेलांच्या किंमती 72 डॉलरच्या आसपास स्थिरावल्याचे पाहायला मिळतेय. मार्च महिन्यात सोन्याच्या किंमती जवळपास 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मागील आठवड्यात दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 400 रुपयांनी घसरून 91,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले होते. अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 99.9 टक्के शुद्धता असलेले सोनं 91,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले. तर, एकीकडे 99.5 टक्के शुद्धता असलेले सोनं 400 रुपयांच्या घसरणीने 90,880 रुपयांवर स्थिरावले होते. त्यानंतर शुक्रवारीदेखील सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सोन्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळं ग्राहकांना दिलासा मिळतोय.
आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसतंय. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढतेय त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ होतेय. पण आज मात्र किंचितशे दर घसरले आहेत. मात्र येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज आहे.