British Beer: तळीरामांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या एका करारामुळं ब्रिटिश बिअर आणि स्कॉच व्हिस्कीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. या मुक्त व्यापार करारामुळं ब्रिटिश बिअरवरील आयात शिल्क तब्बल 75 टक्क्यांनी कमी करण्यात आलं असून त्यामुळं भारतीय ग्राहकांना आता ब्रिटिश बिअर पूर्वीपेक्षा खूपच कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. पूर्वी भारतात आयात होणाऱ्या ब्रिटिश बिअरवर 150 टक्क्यांपर्यंत आयात शुल्कआकारले जात होते. मात्र, भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारानुसार हे शुल्क आता घटवून केवळ ७५ टक्के करण्यात आले आहे.
ब्रिटिश बिअरवरील शुल्क कपातीनंतर त्याचा थेट फायदा मद्यप्रेमींना मिळणार आहे. कारण आता उच्च प्रतीची ब्रिटिश बिअर अधिक परवडणाऱ्या दरात मिळणार आहे. या करारामुळं फक्त बिअरच नव्हे तर इतर काही ब्रिटिश उत्पादनांवरील शुल्कदेखील कमी होणार आहे. ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत अधिक आंतरराष्ट्रीय पर्याय उपलब्ध होतील. भारत आणि ब्रिटन यांच्यातील हा मुक्त व्यापार करार 6 मे रोजी अंतिम झाला. या करारानुसार, ब्रिटिश वाइनवर मात्र भारताने कोणतीही शुल्क सवलत दिलेली नाही.
बिअरवर मर्यादित आयात शुल्क लाभ देण्यात आले असले, तरी वाइनला यातून वगळण्यात आले आहे. म्हणजेच, ब्रिटनमधून आयात होणाऱ्या वाइनच्या शुल्कात कोणतीही कपात होणार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे युरोपीय संघ वाइन क्षेत्रात एक मोठा आणि महत्त्वाचा जागतिक उत्पादक आहे. जर ब्रिटनला वाइनवर आयात शुल्क सवलत दिली गेली असती, तर युरोपीय संघाकडूनही त्यांच्या वाइनवर शुल्क कपातीसाठी भारतावर दबाव वाढू शकला असता. त्यामुळे, वाइनला या सवलतीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्क देखील 150 टक्क्यांवरून घटून 75 टक्के होणार आहे. इतकेच नव्हे तर, या कराराच्या दहाव्या वर्षापर्यंत हे शुल्क आणखी कमी करून 40 टक्क्यांपर्यंत आणण्याची योजना आहे. याशिवाय, ब्रिटन भारतातून येणाऱ्या तयार कपड्यांचे , चामड्याच्या वस्तू यांसारख्या उत्पादनांवरील आयात शुल्कही कमी करणार आहे, ज्यामुळे भारतीय निर्यातीला चालना मिळेल. भारताने काही कृषी उत्पादने जसे की डेअरी उत्पादने, सफरचंद, पनीर, ओट्स, तसेच प्राणी आणि वनस्पती तेलांवरील आयात शुल्कात कोणतीही कपात केलेली नाही, कारण या उत्पादनांवर शुल्क कपात केल्यास देशांतर्गत कृषी क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.