ओला-उबरला सरकारी टॅक्सीची टक्कर, केंद्र सरकार सुरू करणार 'सहकार टॅक्सी'

देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 28, 2025, 08:18 PM IST
ओला-उबरला सरकारी टॅक्सीची टक्कर, केंद्र सरकार सुरू करणार 'सहकार टॅक्सी'

Government Taxi : देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये खासगी टॅक्सी सेवेचा वापर वाढला आहे. मात्र, खासगी टॅक्सी कंपन्यांविरोधात ग्राहकांच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे.  

Add Zee News as a Preferred Source

घरातून ऑफीस किंवा इतर ठिकाणी प्रवास करायचा असेल तर मोठ्या शहरांमध्ये ओला उबर सारख्या खासगी टॅक्सींचा वापर केला जातो. आता केंद्र सरकारही या खासगी टॅक्सींना टक्कर देणार आहे. देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.  केंद्र सरकार देशात सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ही घोषणा केली आहे. याचा कॅबचालकांसह ग्राहकांनाही फायदा होणार आहे. अमित शाह म्हणाले की, आतापर्यंत अशा टॅक्सी सेवांमधून मिळणारे कमिशन श्रीमंत लोकांच्या हातात जायचे आणि ड्रायव्हर बेरोजगार राहायचे. आता हे होणार नाही आणि एक सहकारी क्रांती सुरू होईल.

'सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काही महिन्यांत सहकारी टॅक्सी सेवा येत आहे. ही सहकारी सेवा चारचाकी वाहने, ऑटो आणि दुचाकी वाहनांची नोंदणी करेल. या सेवेत नोंदणी केल्यानंतर, संपूर्ण फायदा थेट ड्रायव्हरला मिळेल.

ओला-उबरला सरकारी टॅक्सीची टक्कर, कशी असेल 'सहकार टॅक्सी' सेवा? 

'सहकार टॅक्सी' ही एक सहकारी राईड-हेलिंग सेवा
ओला आणि उबरच्या धर्तीवर देशात सहकार टॅक्सी सेवा
बाईक, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश
बाईक, कार आणि रिक्षा नोंदणीकृत असतील
चालकांना कोणालाही कमिशन द्यावं लागणार नाही
चालकांना थेट पैसे कमवता येतील
सहकार टॅक्सीमुळे प्रवाशांचाही फायदा होणार

तर इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस्ट ट्रान्सपोर्टने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर सहकार टॅक्सीबाबत टॅक्सीचालकांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळालं. आपणही नोंदणी करून सहकार टॅक्सी चालवू असं मत टॅक्सी चालकांनी व्यक्त केलं आहे. खासगी कंपनीच्या टॅक्सींच्या वाढत्या वापरासोबतच तक्रारींमध्येही वाढ झाली होती. रिक्षा, टॅक्सी चालकांनी भाडी नाकारणं असेल किंवा ओला उबरसारख्या कंपन्यांची मनमानी असेल. यामुळे ग्राहक त्रासले होते. जर केंद्र सरकारची ही सहकार टॅक्सी सुरू झाली तर यातून ग्राहकांची सुटका होणार आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More