Ahemdabad Plane Crash: 'ब्लॅक बॉक्स' उलगडणार दुर्घटनेचं रहस्य; सर्व उत्तरं असलेलं हे Black Box असतं तरी काय?

Ahemdabad Plane Crash News in Marathi: अहमदाबादमधील अपघात विमानाला नेमकं काय झालं होतं याची माहिती आता ब्लॅक बॉक्स हाती लागल्यानंतरच मिळेल. पण हे ब्लॅक बॉक्स नेमकं काय असतं?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2025, 04:16 PM IST
Ahemdabad Plane Crash: 'ब्लॅक बॉक्स' उलगडणार दुर्घटनेचं रहस्य; सर्व उत्तरं असलेलं हे Black Box असतं तरी काय?
अहमदाबादमध्ये विमान अपघात

Ahemdabad Plane Crash News in Marathi: गुजरातमधील अहमदाबाद येथील विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेघानी येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिल्लीहून अहमदाबादमार्गे इंग्लंडला जात असलेलं हे विमान रहिवाशी भागात पडले असून विमानामधून 52 ब्रिटीश नागरिक प्रवास करत होते. हे विमान तांत्रिक बिघाड झाल्याने पडल्याची प्राथमिक माहिती दिली जात असली तरी नेमकं विमानात काय बिघाड झालेला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये असलेल्या डेटाच्या माध्यमातून विमानात नेमकी काय तांत्रिक अडचण निर्माण झाली हे समोर येणार आहे. मात्र विमानाबद्दलची इंत्यभूत माहिती ज्या डिव्हाइजमध्ये साठवली जाते आणि विमान अपघातानंतर कायम चर्चेत असतं ते ब्लॅक बॉक्स नेमकं असतं तरी काय? याचबद्दल जाणून घेऊयात 10 मुद्द्यांच्या मदतीने...

केशरी रंगाचं 'ब्लॅक बॉक्स'

विमानातील एक सर्वात महत्त्वाचे उपकरण म्हणजे 'ब्लॅक बॉक्स'! नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो. जेव्हा पाहिल्यांदा हे बॉक्स विमानात बसवण्यात आलं तेव्हा ते काळ्या रंगाचं असायचं. त्यावरुनच त्याला हे नाव पडलं. कालांतराने या बॉक्सचा रंग बदलला तरी नाव तेच राहिलं.

दोन महत्त्वाचे भाग

ब्लॅक बॉक्स हे उपकरण दोन भागांमध्ये विभागलेले असतं. ज्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) असे दोन मुख्य भागांचा समावेश असतो. विमानाच्या अपघाताच्या तपासात हे दोन्ही भाग अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ही दोन्ही यंत्रं विमानातील डेटा आणि कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड करतात. आता ही दोन यंत्र काय काम करतात ते समजून घेऊयात...

फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR):

हे यंत्र विमानातील विविध पॅरामीटर्स मोजतं. उदाहरण सांगायचं झालं तर विमान किती उंचीवर, किती वेगाने आणि कोणत्या दिशेने उडत आहे यासारखे तपशील यात नोंदवले जातात. इतरही बरीच माहिती यात नोंदवली जाते.

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR):

हे यंत्र कॉकपिटमध्ये होणारा संवाद, सर्व आवाज आणि इतर गोष्टी रेकॉर्ड करते. यात प्रामुख्याने आवाज रेकॉर्ड होतात.

ब्लॅक बॉक्स एवढं महत्त्वाचं का असतं?

कोणत्याही विमान अपघातानंतर, या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेला डेटा आणि आवाज यांचा उपयोग करुन अपघाताचे कारण शोधण्यासाठी केला जातो. 

ब्लॅक बॉक्सची वैशिष्ट्यं काय असतात?

सुरक्षितता: हे उपकरण विमानाच्या मागील भागात ठेवलं जातं. अपघाताच्या वेळी कमीत कमी नुकसान व्हावं या हेतूने हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागील भागात ठेवला जातो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

बॅटरी: या यंत्राच्या बॅटरीची क्षमता खूप जास्त असते, ज्यामुळे ते बराच काळ डेटा रेकॉर्ड करू शकते. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक आवश्यक उपकरण आहे, जे अपघाताच्या तपासात अत्यंत मदत करते.