धक्कादायक! You Tuber ज्योतीचा दहशतवादी हाफिज सईदच्या तळावर 14 दिवस मुक्काम; प्रशिक्षणानंतर भारतात परतली आणि...

Haryana YouTuber Jyoti Malhotra : पाकिस्तानला गेली, दहशतवादी तळावर राहिली आणि... हरियाणाच्या युट्यूबरसंदर्भात हादरवणारी माहिती समोर   

सायली पाटील | Updated: May 20, 2025, 09:21 AM IST
धक्कादायक! You Tuber ज्योतीचा दहशतवादी हाफिज सईदच्या  तळावर 14 दिवस मुक्काम; प्रशिक्षणानंतर भारतात परतली आणि...
Haryana YouTubers Jyoti Malhotra stayed in Muridke hafiz saeed camp in pakistan pahalgam terror attack

Haryana YouTuber Jyoti Malhotra : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाला शस्त्रसंधीचा युद्धविराम मिळाला आणि संभाव्य युद्धाचं सावट दूर झालं. असं असतं तरीही या दोन्ही देशांमध्ये असणारी तणावाची परिस्थिती मात्र अद्यापही निवळलेली नाही. सध्याच्या घडीला (Pahalgam Terror Attack) पहलगाम हल्ल्याच्या धर्तीवर भारतीय तपास यंत्रणा आणि लष्कराकडून विविध स्तरांवर शक्य त्या सर्व मार्गांनी तपासाला वेग देण्यात आला आहे. नवनवीन गोष्टी याच तपासातून समोर येत असून सध्या तपास यंत्रणांनी (You Tube) युट्यूबर्सवर करडी नजर ठेवली आहे. यातून पुढे आलेलं आणि सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं एक नाव म्हणजे ज्योती मल्होत्रा. 

पाकिस्तानमध्ये या युट्यूबरचं जाणं, भारतात असताना पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाला भेट देणं, तेथील अधिकाऱ्यांसोबतचं तिचं वावरणं हे सारंकाही सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलं असून, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे थेट पाकमधील दहशतवादी तळापर्यंत ज्योतीचं पोचोचणं आणि तिथं मुक्काम करणं. 

पाकिस्तानातील मुरिदकेविषयी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं ऐकायला मिळत आहे. हे तेच ठिकाण जिथं लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मुख्य तळ असून, कुख्यात दहशतवादी हाफीज सईदचा ठिकाणा इथंच असतो असंही म्हटलं जातं. विविध अंगांनी करण्यात आलेल्या तपासानुसार भारताची युट्यूबर पाकच्या संपर्कात आल्यानंतर याच त लावर पोहोचली होती आणि तिथं तिनं हेरगिरीचं प्रशिक्षणही घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार मुरिदके येथील प्रशिक्षणानंतरच ज्योतीवर पुढील मोहिम सोपवण्यात आली. मात्र, ही मोहिम सुरू होण्याआधीच बिंग फुटलं आणि ती यंत्रणांच्या तावडीत सापडली. पहलगाम हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच ज्योती पाकिस्तानात गेली असून, तिथं मुरिदकेमध्ये तिचा 14 दिवसांचा मुक्काम असल्याची खळबळजनक बाब आता पुढे आली आहे. 

पाकिस्तानातील संवेदशनशील भागांमध्ये ज्योतीची ये-जा 

पाकिस्तानात गेली असताना ज्योतीला तिथं अनेक प्रतिबंधीत क्षेत्रांमध्येसुद्धा अगदी सहज प्रवेश मिळत होता, ती तिथं हवं तिथे जात होती इतकंच काय तर तिला तिथं पोलिसांचं संरक्षणही पुरवण्यात आल्याचं तपासातून उघड झालं आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील दानिश नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून पाकच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणाऱ्या शाकिर नावाच्या एका व्यक्तीनं तिला या ठिकाणांवरील प्रवेशाची मुभा देऊ केली होती. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : भरदिवसा काळेकुट्ट ढग दाटून येणार; मान्सूनपूर्व पावसाचा मारा 'या' भागांना झोडपणार

ज्योतीला सातत्यानं पाकिस्तानी मित्रांचे फोन येत असून, यामध्ये शाकिरचे फोन सर्वाधित होते. जट रंधावा या नावानं तिनं त्याचा नंबर सेव्ह केला होता. दरम्यान, हरियाणा पोलीस सूत्रांचा हवाला देत एका प्रतिष्ठीत माध्यमाच्या वृत्तानुसार ज्योतीनंय याबाबतचा खुलासा तपासादरम्यान केला. मुरिदकेमधून तिला भारतात नेमकं कोणत्या मोहिमेसाठी पाठवण्यात आलं होतं हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सध्याच्या घडीला ज्योती पाच दिवसांच्या कस्टडी रिमांडवर असून हिसार पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तिची कस्टडी असल्याचं म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणात ज्योती एकटी नसून भारताविरोधातील या कटात 20 हून अधिक जणांचा समावेश असून त्यातील बरेच सोशल मीडिया इंफ्लुएन्सर आहेत ही बाबही समोर आली आहे. त्यामुळं आता या रॅकेटची पाळंमुळं नेमकी कुठवर पोहोचली आहेत याचाच तपास यंत्रणा घेताना दिसत आहेत.