हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gopichand Hinduja passes away: ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य रामी रेंजर यांनी गोपीचंद हिंदुजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.  

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2025, 05:44 PM IST
हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gopichand Hinduja passes away: भारतीय-ब्रिटिश अब्जाधीश आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद परमानंद हिंदुजा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रमी रेंजर यांनी ही माहिती दिली आहे. वरिष्ठ सभागृह असणारं ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य रेंजर यांनी एक निवेदन जारी करत शोक व्यक्त केला आहे. हिंदुजा हे "सर्वात प्रेमळ, नम्र आणि निष्ठावंत मित्रांपैकी एक" होते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे असं भारतीय वंशाचे खासदार म्हणाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

“प्रिय मित्रांनो, जड अंतःकरणाने, मी तुमच्यासोबत आमचे प्रिय मित्र श्री. जी.पी. हिंदुजा यांचं दुःखद निधन झाल्याची माहिती शेअर करत आहे. ते स्वर्गीय निवासासाठी निघून गेले. ते सर्वात दयाळू, नम्र आणि निष्ठावंत मित्रांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे, कारण ते खरोखरच समुदायाचे हितचिंतक आणि मार्गदर्शक होते,” असं रेंजर यांनी निवेदनात म्हटलं आहे. 

“मला त्यांना अनेक वर्षांपासून जाणून घेण्याचा सौभाग्य मिळाल. त्यांच्यातील गुण अद्वितीय होते, उत्तम सेन्स ऑफ ह्युमर, समुदाय आणि भारत यांच्याप्रती वचनबद्धता आणि त्यांनी नेहमीच चांगल्या कामांना पाठिंबा दिला. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढणं कठीण होईल. त्यांना स्वर्गात शांती लाभो. ओम शांती,” असं सांगत त्यांनी निवेदनाचा शेवट केला आहे. 

गोपीचंद हिंदुजा कोण होते?

युके संडे टाईम्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, जीपी हिंदुजा हे सलग सात वर्षे युनायटेड किंग्डममधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 1940 मध्ये त्यांचा भारतात जन्म झाला. त्यांनी हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेडचे ​​अध्यक्ष म्हणूनही काम केलं आणि 2023 मध्ये त्यांचे बंधू श्रीचंद हिंदुजा यांचे डिमेंशियामुळे निधन झाल्यानंतर त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारलं.

गोपीचंद हिंदुजा यांनी 1959 मध्ये मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टरेट ऑफ लॉ पदवी देखील मिळाली. लंडनच्या रिचमंड कॉलेजने त्यांना अर्थशास्त्राची मानद डॉक्टरेट देखील दिली.

हिंदुजा कुटुंबाचा व्यवसाय सुरुवातीला 1914 मध्ये जीपी हिंदुजा यांचे वडील परमानंद हिंदुजा यांनी सुरू केला होता. गोपीचंद हिंदुजा आणि त्यांचे बंधू श्रीचंद हिंदुजा यांनी हा व्यवसाय हाती घेतला, जो प्रामुख्याने एक व्यापारी कंपनी होती आणि त्याचे रूपांतर आताच्या अब्जावधी डॉलर्सच्या समूहात केले.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More