आता मतदार ओळखपत्रही आधार कार्डशी जोडणार! प्रक्रिया जाणून घ्या स्टेप बाय स्टेप!

Aadhaar-Voter Id Card Link: आता मतदान ओळखपत्रही आधारकार्डला जोडले जाणार आहे

Pravin Dabholkar | Updated: Mar 18, 2025, 06:49 PM IST
आता मतदार ओळखपत्रही आधार कार्डशी जोडणार! प्रक्रिया जाणून घ्या स्टेप बाय स्टेप!
वोटर आयडी-आधार लिंक

Aadhaar-Voter Id Card Link: पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतं. तुमचे पीएफ अकाऊंटदेखील आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन करण्यात येते. यात आता मतदान ओळखपत्रही आधारकार्डला जोडले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर आता आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचा मार्ग मोकळा झालाय. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.  हेतू कितीही चांगले असले तरी, या कामात कायदेशीर ते राजकीय अशा अनेक आव्हाने आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

डेटा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान

2021 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा केल्यानंतर, मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्याची परवानगी देण्यात आली. निवडणूक आयोगाने लोकांकडून त्यांचे आधार क्रमांक मागताना हे ऐच्छिक असल्याचे म्हटले होते. म्हणजेच ज्यांना दोन्ही कागदपत्रे लिंक करायची आहेत ते तसे करू शकतात आणि ज्यांना नको आहेत त्यांनी तसे करू नये.आयोगाला आतापर्यंत 66.23 कोटी आधार क्रमांक मिळाले आहेत. असे असले तरी हे अद्याप मतदार ओळखपत्राशी जोडलेले नाहीत.नागरिकांना आपल्या गोपनीयतेबद्दल चिंता आहे. आज खासगी डेटा लीक ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. जेव्हा आधार आणि मतदार ओळखपत्राचा डेटाबेस एकत्र केला जाईल, तेव्हा ते सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आणखी मोठे होईल. लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहू नये अशा सॉफ्टवेअर आणि साधनांची आवश्यकता असेल.

जाणून घ्या स्टेप बाय स्टेप 

तुमचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला मतदार सेवा पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यानंतर पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करा. 

सर्वप्रथम  मतदार सेवा पोर्टलला भेट द्या आणि 'फॉर्म' पर्यायावर क्लिक करा.जर तुम्ही नोंदणीकृत असाल, तर तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि 'लॉगिन' वर क्लिक करा.

जर तुम्ही नोंदणीकृत नसाल, तर 'साइनअप' पर्यायावर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा. तुमचा मोबाइल नंबर, कॅप्चा कोड भरा आणि 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा. ओटीपी, तुमचा ईपीआयसी क्रमांक, पासवर्ड यासारखे आवश्यक तपशील भरा आणि 'नोंदणी करा' बटणावर क्लिक करा.

नोंदणी केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड भरुन करून लॉग इन करा. 'फॉर्म ६बी' वर क्लिक करा. राज्य आणि तुमचा विधानसभा/संसदीय मतदारसंघ निवडा. 

तुमची वैयक्तिक माहिती एंटर करा, ओटीपी, आधार क्रमांक एंटर करा आणि 'प्रिव्ह्यू' बटणावर क्लिक करा.

'सबमिट' वर क्लिक करा. तुमचा अर्ज ट्रॅक करण्यासाठी एक संदर्भ क्रमांक दिला जाईल.