मसूद अजहरच्या 'मुसक्या' आवळणारा अधिकारी म्हणतो; माझा धोनीच्या विचारसरणीवर विश्वास

वेळ निघून गेली असा विचार करून हार मानायची नसते

Updated: May 2, 2019, 06:31 PM IST
मसूद अजहरच्या 'मुसक्या' आवळणारा अधिकारी म्हणतो; माझा धोनीच्या विचारसरणीवर विश्वास

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. गेल्या दहा वर्षांपासून भारताकडून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने यासाठी आणखीनच कंबर कसली होती. या सगळ्यात संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सगळ्यानंतर अकबरुद्दीन यांनी एक रंजक खुलासाही केला. त्यांनी सांगितले की, मी नेहमी महेंद्रसिंग धोनीच्या विचारसरणीने चालतो. एखाद्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक वेळ तुमच्याकडे असतो. त्यामुळे कधीही वेळ निघून गेली असा विचार करून हार मानायची नसते, हे मी धोनीकडून शिकल्याचे अकबरुद्दीन यांनी सांगितले. 

मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात चीनकडून सातत्याने आडकाठी आणली जात होती. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या दहशतवादी कृत्यांविरोधात वातावरणनिर्मिती करून सुरक्षा परिषदेतील देशांना या प्रस्तावासाठी राजी केले. मात्र, तरीही चीन आपली आडमुठी भूमिका बदलायला तयार नव्हता. अखेर फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन या देशांच्या दबावानंतर चीनने माघार घेतली होती. 

मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे मोठे यश मानले जात आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानलाही मोठा झटका बसला आहे.