'नाव बदलून काय होणार?' अरुणाचलमधील काही ठिकाणांची नावं बदलणाऱ्या चीनला भारतानं खडसावलं

India China News: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती काही अंशी कमी झाली असली तरीही सीमावादाचा मुद्दा अद्यापही मागे सरलेला नाही हेच खरं.   

सायली पाटील | Updated: May 14, 2025, 11:51 AM IST
'नाव बदलून काय होणार?' अरुणाचलमधील काही ठिकाणांची नावं बदलणाऱ्या चीनला भारतानं खडसावलं
India china tension Rejects China Attempts To Rename Places In Arunachal Pradesh Mea Issued Strict Statement Know All

India China News: अरुणाचल प्रदेशातील बहुतांश भागांमधील अनेक भागांची नावं बदलल्यानंतर चीनच्या या खुरापती कारवाईला भारतानं स्पष्ट भाषेत उत्तर दिलं आहे. भारताच्या केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं याबाबत परखड मत मांडण्यात आलं आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यामध्ये काही ठिकाणांना चिनी नावं देत व्यर्थ प्रयत्न सुरूच ठेवल्याचं म्हणत भारतानं शेजारी राष्ट्रावर कटाक्ष टाकला. 

नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही... 

नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही असं म्हणत चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलली जाताच परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 'नावं जरी बदलली तरी वास्तव बदलणारच नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे' अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयानं चीनला स्पष्ट उत्तर दिलं. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनला खडसावलं. 'हे रचनात्मक नामकरणाचं पाऊल वास्तव मात्र बदलू शकणार नाही की अरुणाचल प्रदेश हा भारताता एक अविभाज्य भाग होता, आहे आणि कायमच राहील', असं त्यानी स्पष्ट शब्दांत सांगितलं. 

चीन काही सुधरेना... 

फार आधीपासून अरुणाचल प्रशात तणावाच्या परिस्थिती भर टाकण्याचं काम चीनकडून केलं जात असून हा भाग त्यांच्या देशाशी संलग्न असल्याचा दावा चीनकडून सतत करण्यात येत आहे. याच कारणास्तव ईशान्येकडील अनेक शहरांची नावं बदलून किंवा नकाशात भारतीय हद्दीतील काही भाग आपल्या देशाचा भाग असल्याचं भासवत चीनकडून सतत नवे नकाशेही जाहीर करण्यात येतात. 

यापूर्वीसुद्धा साधारण 2024 मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशमधील जवनळपास 30 ठिकाणांची नावं बदलत त्यांना चिनी ओळख देत याची यादीसुद्धा जाहीर केली होती. भारताने मात्र ही यादी समोर येताच फेटाळून लावत चीनचा मनसुबा उधळून लावला होता. त्यामुळं आता पुन्हा याचीच पुनरावृत्ती झाल्यानं चीनचं यावर काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.