Wedding Traditions : असं म्हणतात की रक्ताच्या नात्यांपेक्षा मनानं जोडली गेलेली नाती कैक वर्षांसाठी टीकतात आणि आणखी दृढही होतात. भारतात एक असंच गाव आहे, जिथं ही नाती लग्नाच्या बंधनानं दृढ होतात आणि एकमेकांशी कुटुंबच्या कुटुंब जोडली जातात. या गावात लग्नाची एक अशी परंपरा आहे जिथं एका विशिष्ट समुदायाची माणसं आपल्याच समुदायात लग्न करतात आणि या गावातून माहेर सोडून निघालेल्या मुलींना गावातच सासरही मिळून जातं.
मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील खन्नाथ नावाच्या गावात ही प्रथा प्रचलित आहे, जिथं सारं गावातच एकमेकांचे नातलग आहेत. इथं एका व्यक्तीचं किमान तीन गावकऱ्यांशी थेट नातं असतंच. या गावात पटेल बहुलसमाज असून चार हजारांहून अधिक या गावची लोकसंख्या आहे. या गावातील बहुसंख्य कुटुंब पटेल समुदायातील असून, गावातल्या गावातच आपल्या मुलांची लग्न लावून देतात. एका अहवालातील आकडेवारीनुसार या गावातील जवळपास 500 लग्न तिथल्या तिथेच पार पडली आहेत. आता जरी काही स्थळं गावाबाहेरची असली तरीही त्यांची संख्या मात्र अगदी नगण्य आहे.
पटेल समुदायाच्या तरुण- तरुणींना गावातच लग्न करण्याची मुभा असते. जोडीदार निवडून या मंडळींनी फक्त मोठ्यांना त्याची कल्पना देणं अपेक्षित असतं. ज्यानंतर कुटुंबीय विधीवत हा लग्नसोहळा आयोजित करतात. वर्षभरात या गावात सरासरी चार ते पाच लग्नसोहळे अशाच पद्धतीनं पार पडतात.
खन्नाथ गावातील समुदायाचा हुंड्याला किंवा लग्नातील आर्थिक देवाणघेवाणीला विरोध असून, आतापर्यंतच्या लग्नांमध्ये इथं कधीच हुंडा घेण्यात किंवा देण्यात आलेला नाही. टिळा लावताना फक्त शुभशकुनाचे 51 रुपये इथं दिले जातात. आश्चर्याची बाब आणि गावकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत गावातच झालेल्या या लग्नांमध्ये एकही काडीमोड किंवा घटस्फोट झालेला नाही. काही कारणास्तव नातेवाईकांमध्ये मतभेद झाले, तर ते संवाद साधून मिटवले जातात पण, इथं नात्यांना मात्र तडा जाऊ दिला जात नाही. आहे की नाही, नातं जपणारं हे गाव... लाखात एक!!!