बोफोर्सचे तोंड उघडून दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त, पाकिस्तानी सैन्य बुचकळ्यात
भारतीय सेनेने पुन्हा एकदा बोफोर्सचे तोंड उघडले आणि पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांच्या नाकी नऊ आणले.
श्रीनगर : कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर बोफोर्स तोफ भारतीय सेनेच्या पुन्हा एकदा मदतीस आली आहे. शनिवारी भारतीय सेनेने पुन्हा एकदा बोफोर्सचे तोंड उघडले आणि पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांच्या नाकी नऊ आणले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार आणि शनिवार दरम्यान पाकिस्तानच्या बाजुने दहशतवादी भारतीय सीमेत दाखल होण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीम (BAT) त्यांना मागून साथ देत होते. पण भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर देत त्यांचे तोंड बंद केले.
जेव्हा बोफोर्स तोफेतून गोळे डागले जाऊ लागले तेव्हा पाकिस्तानची सर्व तयारी फिस्कटली. बोफोर्समधून निघालेला प्रत्येक गोळा हा पाकिस्तानी सैन्याला उद्धस्त करत होता. बोफार्सच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून कोणतेही प्रत्युत्तर आले नाही. बोफोर्सने सीमेपलीकडच्या अनेक दहशतवादी कॅम्पचे नुकसान केले. पाकिस्तानी बॉर्डर एक्शनचे 7 सैनिकही यात मारले गेले. भारताने फोटे समोर ठेवत याचे पुरावेही दिल्याची माहीती सुत्रांनी दिली.
भारत बोफोर्सचे तोंड उघडून अशाप्रकार उत्तर देईल याचा अंदाज पाकिस्तानला नव्हता. त्यामुळे त्यांचे सैनिक गोंधळले आणि काहीच उत्तर देऊ शकले नाहीत असे माहीती भारतीय सैन्यातील सुत्रांनी दिली आहे.
'मृतदेह परत न्यावेत'
३१ जुलै आणि १ ऑगस़्टदरम्यान पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीर येथे असणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या चौक्यांना निशाणा करण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेजारी राष्ट्राकडून करण्यात आलेल्या घुसखोरीचं भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या कारवाईत ४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तर, नियंत्रण रेषेनजीक सक्रीय असणाऱ्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातही सैन्यदलाला यश आलं होतं. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने पांढरा ध्वज फडकावत हे मृतदेह परत न्यावेत असा संदेश भारताकडून देण्यात आला आहे. पाकिस्तानकडून मात्र भारतीय सैन्याच्या या प्रस्तावाला अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही.