भारताची लोकसंख्या दीडशे कोटींच्या पुढे जाता कामा नये- रामदेव बाबा
सरकारी रुग्णालये व शाळा अशा सुविधांचा लाभ देणेही थांबवले पाहिजे.
नवी दिल्ली: कोणत्याही परिस्थितीत भारताची लोकसंख्या दीडशे कोटींच्या पुढे जाता कामा नये. अन्यथा परिस्थिती अवघड होईल, असा इशारा बाबा रामदेव यांनी दिला आहे. त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
यावेळी त्यांनी म्हटले की, भारताच्या लोकसंख्येने दीडशे कोटींचा टप्पा ओलांडता कामा नये. आपण यापेक्षा जास्त लोकसंख्येचा भार पेलण्यासाठी तयार नाही. त्यामुळे सरकरने यासाठी कायदाच केला पाहिजे. दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्या नागरिकांचा मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा हक्क काढून घेतला पाहिजे. तसेच त्यांना सरकारी रुग्णालये व शाळा अशा सुविधांचा लाभ देणेही थांबवले पाहिजे, असे मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले.
यापूर्वीही रामदेव बाबा यांनी हा प्रस्ताव मांडला होता. लोकसंख्या हा राजकीय आणि राष्ट्रीय मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या कमी होती, तेव्हा ज्यादा मुलांना जन्माला घालण्याचे समर्थन करण्यात आले. ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि ज्यांची गरज आहे त्यांनी मुलांना जन्माला घालावे. पण दोन मुले आम्हालाही द्या. आनंदी राहण्यासाठी पत्नी आणि मुलांची गरज नाही. अविवाहित असतानाही आपण सुखी राहू शकतो, असे त्यांनी म्हटले होते.