'अरे माझ्या मुलीचं खालून रक्त पडतंय, सॅनिटरी पॅड द्या,' हतबल बापाने Indigo कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; त्यांचं उत्तर ऐकून आणखी संतापला

Indigo Passenger Viral Video: या व्हिडिओने केवळ इंडिगोच्या अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही तर विमानतळावरील इतरांनी दाखवलेल्या माणुसकीच्या अभावालाही अधोरेखित केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 5, 2025, 04:00 PM IST
'अरे माझ्या मुलीचं खालून रक्त पडतंय, सॅनिटरी पॅड द्या,' हतबल बापाने Indigo कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; त्यांचं उत्तर ऐकून आणखी संतापला

Indigo Passenger Viral Video:  इंडिगोच्या विमानांचं उड्डाण रद्द झाल्याने देशभरात लाखो प्रवासी विमानतळांवर अडकले आहेत. गुरुवारी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. यामुळे अनेक गर्दीच्या विमानतळांवर प्रवाशांचा गोंधळ उडाला. सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. अनेकांनी उड्डाण रद्द झाल्याने आणि दीर्घ विलंबाबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे, अचानक वेळापत्रकात बदल आणि स्पष्ट संवादाचा अभाव याबद्दल इंडिगोला जाब विचारला जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

यादरम्यान विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या मुलीला रक्तस्त्राव होत असल्याने वारंवार सॅनिटरी पॅडची मागणी करताना दिसत आहे. "सिस्टर माझ्या मुलीला सॅनिटरी पॅड हवं आहे. तिचं रक्त वाहत आहे. वडील रडत आहेत. विमानांचं वेळेत उड्डाण होत नाही आहे. पॉवरच्या नावाखाली फक्त अंदाज लावले जात आहेत," असा संताप तो व्यक्त करताना दिसत आहे.

या घटनेमुळे प्रवासी किती हतबल स्थितीत आहेत हे अधोरेखित होत आहे. अनेकांनी हे आता संयमाचं शेवटचं टोक असल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. "हे प्रकरण सर्वांसमोर मांडणारा बाप किती असहाय्य असेल याचा विचार करा आणि दुःखाची गोष्ट म्हणजे कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही," अशी टिप्पणी एका युजरने केले आहे. तर एका युजरने हे साधं एक पॅड देऊ शकत नाहीत अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

दुसऱ्या एका युजरने माणुसकीच्या भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "हो, तांत्रिक समस्या घडतात. त्या पुन्हा घडतील, फक्त येथेच नाही तर जगभरात. पण अशा क्षणी, आपण माणूस म्हणून अपयशी ठरत नाही का? आपण विसरू नये - प्रणाली आणि वेळापत्रकाच्या पलीकडे, आपण प्रथम माणूस आहोत," असं त्याने म्हटलं आहे. 

दरम्यान अशाच दुसऱ्या एका घटनेत संतापलेला प्रवासी बेफिकीर इंडिगो अधिकाऱ्यावर ओरडू लागला आणि त्याच्या विमानाची स्थिती विचारत होता, "इधार आ ना, जवाब दे ना,"  शेकडो इंडिगो उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचा संयम सुटला आहे. शेवटच्या क्षणी उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

"लोकांची निराशा योग्य आहे परंतु त्यांनी हे देखील समजून घेतले पाहिजे की हे लोक फक्त सहाय्यक कामगार आहेत, त्यांना जास्त माहिती नाही, जर त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारावे," असं एकाने म्हटलं आहे. एकाने म्हटले, "तुम्हाला वाटते का की फ्रंट डेस्कवर बसलेले हे लोक त्यांच्या खिशात विमान लपवत आहेत? आम्हाला इतके अधिकार आहेत का?".

इंडिगोचे निवेदन

इंडिगोने परिस्थितीबाबत निवेदन जारी केले असले तरी, प्रवाशांना अद्याप या वेळापत्रकाच्या गोंधळावर योग्य तोडगा सापडलेला नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशी सुरू केल्यानंतर, इंडिगोने विमान वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सामान्य करण्यासाठी दोन दिवसांची मागणी केली आहे. पुढील 48 तासांत कॅलिब्रेटेड उपाययोजना करण्याची योजना देखील त्यांनी आखली आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More