'विमान उडवायची लायकी नाही, तू जाऊन बूटच शिव' ट्रेनी पायलटसोबत धक्कादायक प्रकार; पुढे जे झालं....

IndiGo trainee pilot: इंडिगोच्या उड्डाणातील प्रशिक्षणार्थी पायलटने 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीवादाचा आरोप केलाय.

प्रविण दाभोळकर | Updated: Jun 23, 2025, 02:21 PM IST
'विमान उडवायची लायकी नाही, तू जाऊन बूटच शिव' ट्रेनी पायलटसोबत धक्कादायक प्रकार; पुढे जे झालं....
इंडिगो विमान

IndiGo trainee pilot: अहमदाबाद विमान अपघातात 264 जणांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला. ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधलं जातंय. यादरम्यान एअर इंडिया कंपनी चर्चेत आली. एअर इंडियाने आपल्या 3 दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली. आता इंडिगो कंपनी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीय. जातीवाचक विधान केल्याने इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीवादाचा आरोप

इंडिगोच्या उड्डाणातील प्रशिक्षणार्थी पायलटने 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीवादाचा आरोप केलाय.  'तू विमान उडवण्याच्या लायक नाहीयस, जाऊन बूट शिव', असे म्हणत मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिणवल्याची तक्रार एका ट्रेनी पायलटने केलीय. प्रत्यक्षात हा पायलट अनुसूचित जातीचा आहे. या प्रकरणाबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर

इंडिगोचे अधिकारी मनीष साहनी, तापस डे आणि कॅप्टन राहुल पाटील यांच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार प्रथम बेंगळुरूमध्ये करण्यात आली होती. जिथे पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर ती इंडिगोचे मुख्यालय असलेल्या गुरुग्राम येथे हस्तांतरित करण्यात आली. गुन्हा कुठेही झाला असला तरी कोणत्याही पोलिस ठाण्यात शून्य एफआयआर नोंदवता येते.

प्रशिक्षणार्थी पायलटने काय केले आरोप?

प्रशिक्षणार्थी पायलटने आपल्या तक्रारीत 28 एप्रिल रोजी इंडिगोच्या गुरुग्राम येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. ही बैठक सुमारे 30 मिनिटे चालली. या दरम्यान 'तुम्ही विमान उडवण्यास योग्य नाही, परत जा आणि जाऊन चप्पल शिवा, तुम्ही येथे चौकीदार राहण्यासही योग्य नाही' असे तक्रारदाराला सांगण्यात आले. अधिकाऱ्यांना त्यांचा राजीनामा हवा होता म्हणून त्यांना त्रास देण्यात आल्याचा आरोप  प्रशिक्षणार्थी पायलटने केलाय.

इंडिगोकडेही तक्रार केली पण कोणतीही कारवाई नाही

मला व्यावसायिक छळाला सामोरे जावे लागले. माझा पगार विनाकारण कापण्यात आला. मला पुनर्प्रशिक्षण सत्रांसाठी जाण्यास भाग पाडण्यात आले आणि विनाकारण वॉर्निंग लेटर्स देण्यात आल्याचे ट्रेनी पायलटने आपल्या तक्रारीत म्हटलंय. ट्रेनी पायलटने हा विषय उच्च अधिकाऱ्यांसमोर आणि इंडिगोच्या नीतिमत्ता पॅनेलसमोर उपस्थित केला होता. पण संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर मी पोलीस तक्रार दाखल केल्याचे ट्रेनी पायलटने म्हटले.