श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरी ही जम्मू-काश्मीरमध्ये सुरुच असल्याचं दिसत आहे. शनिवारी सकाळी कुपवाडा जिल्ह्यात भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सैन्यातर्फे परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
शनिवारी सकाळी अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्याने मध्यरात्रीपासून सकाळी ६.४५ पर्यंत गोळीबार सुरुच ठेवला होता.
शुक्रवारी सिमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. या शहीद जवानाचं नाव बृजेंद्र बहादुर सिंह असं आहे. तसेच पाककडून करण्यात आलेल्या या गोळीबारात एक स्थानिक नागरिकही जखमी झाला होता.