पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर  #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

InsuranceDekho चे प्रोडक्ट हेड यजुर महेंद्रू यांनी लिंक्डइनला पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन मालदीवसाठी प्रवास विमा देण्याची सुविधा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या देशासोबत एकजुटीने उभे आहोत आणि आमच्या देशाच्या हिताशी एकरूप आहोत. अतुलनीय सौंदर्य आणि मोहकता दर्शविणारे लक्षद्वीपसारख्या आपल्या बेटांचा आनंद घेण्याची ही वेळ आहे".


EaseMyTrip कडून सर्व बुकिंग रद्द


मालदीवच्या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत मालदीवमधील 8,000 हून अधिक हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. तर 2500 हून अधिक लोकांनी मालदीवला जाणाऱ्या विमानांची तिकिटे रद्द केली आहेत.


मालदीवच्या बहिष्कार मोहिमेदरम्यान EaseMyTrip ने एक मोठे पाऊल उचलले आहे. EaseMyTrip ने मालदीवच्या सर्व फ्लाइटचे बुकिंग स्थगित केले आहे. EaseMyTrip ही एक भारतीय ऑनलाइन प्रवासी कंपनी आहे. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या काही मंत्र्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा जबर फटका आता मालदीवच्या पर्यटनाला बसत आहे.


भारताच्या समर्थनार्थ उभं राहून EaseMyTrip ट्रॅव्हल कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून ट्रॅव्हल्स कंपनीने आपला संताप व्यक्त केला आहे. निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशासोबत एकजुटीने उभं राहण्यासाठी इज माय ट्रिपने मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहेत,' असे निशांत पिट्टी यांनी म्हटलं आहे.


दरम्यान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर फक्त भारतच नाही तर जगभरातून या जागेचा शोध घेतला जात आहे. मेक माय ट्रिपने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लक्षद्वीपच्या सर्चमध्ये 3400 टक्के वाढ झाली आहे. 


“माननीय पंतप्रधानांच्या भेटीपासून लक्षद्वीपसाठी प्लॅटफॉर्मवरील सर्चमध्ये 3400 टक्के वाढ झाली आहे. भारतीय समुद्रकिनाऱ्यांबद्दलच्या या स्वारस्यामुळे आम्हाला भारतीय प्रवाशांना देशातील समुद्रकिनारे पाहण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ऑफर आणि सवलतींसह प्लॅटफॉर्मवर 'बीचेस ऑफ इंडिया' मोहीम सुरू करण्यास प्रेरित केले आहे", असं MakeMyTrip ने एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.