दार ठोकलं, पाणी मागितलं आणि ... जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? संशयास्पद हालचालींचा भीतीदायक घटनाक्रम

Jammu Kashmir : भारताच्या सीमाभागात असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सध्या सैन्यदलानं दहशतवादाला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. 

सायली पाटील | Updated: May 15, 2025, 07:43 AM IST
दार ठोकलं, पाणी मागितलं आणि ... जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? संशयास्पद हालचालींचा भीतीदायक घटनाक्रम
jammu kashmir kathua woman reports suspicious movement search operation underway after operation sindoor

Jammu Kashmir : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प प्रमाणातच कमी झाला आहे ही वस्तूस्थिती. सध्या भारतीय लष्कराकडून या संवेदनशील भागात अतिदक्षता पाळली जात असताना एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत मिळत आहेत. 

जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील एका गावात काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींमुळे संरक्षण यंतर्णा पुन्हा सतर्क झाली आहे. ज्यामुळं या भागाच्या कानाकोपऱ्यात शोधमोहिम हाती घेत या संशयास्पद व्यक्तींना हेरण्याचाप्रयत्न सुरु करण्यात आला आहे. घघवाल आणि नजीकच्या क्षेत्रामध्ये ही कारवाई सैन्यानं हाती घेतल्याचं म्हटलं गेलं.

स्थानिक महिलेच्या घराचं दार ठोठावलं आणि... 

संरक्षण यंत्रणांच्या माहितीनुसार एका स्थानिक महिलेनं पोलिसांना घडला प्रकार सांगितला, जिथं तिनं सैन्याच्या वर्दीत काही संशयास्पद व्यक्तिंना पाहिलं. या दोन व्यक्ती तिच्या घरी आल्या, दार ठोठावलं आणि तिच्याकडे पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर आपण कॅम्पला माघारी जात आहोत असं ते म्हणाले आणि तिथून निघून गेले. या व्यक्तींच्या सर्वच हालचाली महिलेला संशयास्पद वाटल्याचं लक्षात येताच तिनं तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. 

सदर घटनेनंतर घघवाल आणि नजीकच्या भागांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीनं त्याची माहिती संरक्षण यंत्रणांन द्यावी असं आवाहन करण्यात आलं. 

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या बळावर तातडीनं या भागात शोधमोहिम आणि इतर कारवाई हाती घेतली मात्र संशयितांची ओळख अद्यापही पटलेली नाही. ज्यामुळं सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, या पार्श्वभूमीवर कठुआ भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली असून या भागातील घराघरासह वन क्षेत्र पिंजून संशयितांचा शोध घेतला जात आहे. 

सैन्याच्या वर्दीचा दुरूपयोग होऊ शकतो... 

जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं दहशतवादी संटनांची घुसखोरी वाढली असतानाच आता या परिस्थितीमध्ये नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सैन्यदलाच्या वर्दीचा दुरुपयोग करून सीमाभागात उलथापालथ माजवण्यातं काम केलं जाऊ शकतं असा इशारा देत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे. परिणामी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नका, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, अनोळखी व्यक्तींच्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि संशयास्पद गोष्टी आढळल्यास सैन्य- पोलिसांना याची माहिती द्या असं आवाहन करण्यात आलं आहे.