Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावातून एक संतापजनकर प्रकार समोर आला आहे. मुलाने प्रेम केल्याची शिक्षा त्याच्या आईला देण्याची घटना घडली आहे. गावकऱ्यांकडून मुलाच्या आईला कथितरित्या निर्वस्र करण्यात आले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर तिला मारहाण करुन तिची धिंड काढण्यात आली. हा प्रकार ऐकून कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय आहे हा संपूर्ण प्रकार? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील महिलेला निर्वस्र करुन विजेच्या खांबाला बांधण्यात येऊन मारहाण केल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेच्या मुलाचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. दोघांचे एकमेकांवर करत प्रेम होते पण मुलीचे दुसरीकडे लग्न लावून देण्यात येणार होते. आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या कुटुंबाला कळाली. यानंतर संतप्त कुटुंबाने मुलाच्या घराची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर मुलाच्या आईला ओढून नेले. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे. बेळगावी जिल्ह्यातील वंटमुरी गावात ही घटना घडली.  24 वर्षांचा अशोक आणि 18 वर्षांची प्रियंका एकमेकांवर प्रेम करायचे. दोघेही एकाच गावचे आणि एकाच समाजाचे आहेत. प्रियांकाचे दुसऱ्याशी लग्न लावून दिले जाणार होते. त्यामुळे10-11 डिसेंबरच्या रात्री दोघेही गाव सोडून निघून गेले.


या प्रकारामुळे मुलीचे आई-वडील आणि नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी मुलाच्या घरात प्रवेश केला. तेथे त्यांनी त्याच्या आईला मारहाण केली. मुलाच्या आईला विवस्त्र करुन तिची गावात धिंड काढली. तिला विजेच्या खांबाला बांधले.पहाटे 4 वाजता माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गावात आले आणि त्यांनी महिलेला खांबातून सोडले. यानंतर पोलिसांनी 7 आरोपींना अटक केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी X वर या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. ही घटना अमानवीय असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आमचे सरकार असे गुन्हे कोणत्याही कारणास्तव खपवून घेणार नाही. या प्रकरणी यापूर्वीही अनेकांना अटक करण्यात आली आहे. कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि दोषींना कठोर शिक्षा होईल, असेही ते म्हणाले. 



दरम्यान गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. गाव सोडून गेलेल्या जोडप्याला परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.