'आई आणि बहीण रोज वडिलांबरोबर...', DGP हत्या प्रकरणात मुलाने सगळंच सांगितलं; जबाब आला समोर

Karnataka DGP Om Prakash Murder Case: या प्रकरणामध्ये कर्नाटक पोलिसांनी मयत डीजीपींच्या मुलाचा जबाब नोंदवला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 22, 2025, 12:17 PM IST
'आई आणि बहीण रोज वडिलांबरोबर...', DGP हत्या प्रकरणात मुलाने सगळंच सांगितलं; जबाब आला समोर
मयत निवृत्त डीजीपींच्या मुलाचा खळबळजनक खुलासा

Karnataka DGP Om Prakash Murder Case: कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येच्या बातमीनं देश हादरुन गेला आहे. रविवारी बंगळुरुमधील निवासस्थानी ओम प्रकाश यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांची पत्नी पल्लवीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पल्लवी यांनीच मुलीच्या मदतीने पतीला संपवल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहे. असं असतानाच आता ओम प्रकाश यांच्या मुलाचा जबाब समोर आला आहे. 

मुलगा कार्तिकेशचा धक्कादायक जबाब

ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेशने त्याची आई पल्लवी आणि बहीण कृतीबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. ओम प्रकाश हे डायनिंग टेबलवर बसून माशांचा आस्वाद घेत असतानाच अचानक त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे. मागील काही दिवसांपासून ओम प्रकाश हे त्यांच्या कुटुंबियाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे फार त्रासलेले होते. त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती त्यांच्याशी सतत वाद घालायचे.  बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार कार्तिकेशने, "आई आणि बहिणीने दोघींही डिप्रेशनमध्ये होत्या. त्या रोज वडिलांबरोबर वाद घालायच्या. मला पूर्ण खात्री आहे की या दोघांनीच माझ्या वडिलांची हत्या केली आहे," असा जबाब नोंदवला आहे. कार्तिकेशने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारेच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

जीव घेईन अशा धमक्या देत होती

ओम प्रकाश यांच्या मुलाने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कार्तिकेशने मागील एका आठवड्यापासून माझी आई माझ्या वडिलांचा जीव घेईन अशा धमक्या देत होती. माझे वडील माझ्या आत्याच्या घरी म्हणजेच सरिता यांच्याकडे राहत होते असंही कार्तिकेशने पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणामध्ये कार्तिकेशचा हा जबाब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि चाकूने हल्ला

पल्लवीला स्किझोफ्रेनिया आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. प्राथमिक तपासात दिसून आलं आहे की ओम प्रकाश आणि पल्लवी यांचं कुटुंबातील एका सदस्याला हस्तांतरित केलेल्या स्थावर मालमत्तेवरून वाद झाला. त्यानंतर पत्नीने आधी ओम प्रकाश यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यांनंतर त्यांना बांधून ठेवत त्यांच्यावर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. 68 वर्षीय पोलीस आयुक्तांची हत्या करण्यासाठी पत्नीने ग्लास बॉटलचाही वापर केल्याचं सांगितलं जात आहे. 

व्हिडीओ कॉल करुन गुन्ह्याची कबुली

हत्या केल्यानंतर पल्लवीने एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला फोन करुन आपण पतीची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. 'मी राक्षसाला ठार केलं आहे', असं तिने व्हिडीओ कॉल करुन या महिलेला सांगितलं. या महिलेने तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पल्लवी यांना अटक करण्यात आली असून त्यांची मुलगी कृतीही पोलिसांच्या ताब्यात आहे.