कर्नाटकमध्ये हिजाब वाद चिघळला, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आमने-सामने, वाचा नेमका काय आहे वाद
महाविद्यालयामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रवेश देण्यात आला, त्यानंतर भगवा गमछा घातलेले विद्यार्थी तेथे पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली.
Hijab Controversy In Karnataka : कर्नाटकातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या हिजाबवर बंदी (Karnataka Hijab Row)घालण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी (High Court Hearing on Hijab) सुरू आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आमने सामने आले आहेत. (Violent Protest over Hijab)
हिजाबच्या वादावरून कर्नाटकातील (Karnataka) उडपीमध्ये निदर्शने तीव्र झाली आहेत. हिजाब घातलेल्या मुली आणि भगवा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी उडपी इथल्या महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज कॅम्पसमध्ये आंदोलन केलं. पोलिस प्रशासन विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असून विद्यार्थ्यांना वर्गात परतण्यास सांगितलं जात आहे.
हिजाब वादाचं प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे.
काय आहे वाद?
मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब हा त्यांच्या धार्मिक परंपरेचा भाग असल्याचं म्हटलं आहे. महाविद्यालयात हिजाब घालण्यापासून रोखणं चुकीचं आहे, असं या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. तर त्यांनी धार्मिक कपडे घातले तर आम्हीही भगवा गमछा परिधान करुन महाविद्यालयात येऊ असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाविद्यालय प्रशासनाचं म्हणणं आहे. पोलीस दलाला पाचारण करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं महाविद्यालय प्रशासनाने म्हटलं आहे.
कर्नाटक सरकारच्या नवीन आदेशानुसार, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य आहे. सध्या हा निर्णय सरकारी शैक्षणिक संस्थांना लागू आहे. खाजगी शाळा स्वतःचा ड्रेस ठरवू शकतात. कर्नाटक शिक्षण कायदा 1983 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांना एकच पोशाख घालावा लागणार आहे.
'हिजाबचा वाद' कसा सुरू झाला?
हिजाबबाबतचा वाद उडपीमधील एका महाविद्यालयामधून सुरू झाला होता. या महाविद्यालयात गेल्या जानेवारीत हिजाबवर बंदी घालण्यात आली होती. हिजाब घातलेल्या मुलींना गेटवर थांबवण्यात आलं. यानंतर एका विद्यार्थिनीने कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली की, हिजाब घालण्याची परवानगी न देणं घटनाबाह्य आहे, असं विद्यार्थिनीचं म्हणणं होतं. त्यानंतर हा वाद आणखी वाढला.