कुलभषण जाधव यांची पत्नी, आईसोबत उद्या होणार भेट

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने कारागृहात बंदिवान बनविलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई उद्या (25 डिसेंबर) भेटणार आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 24, 2017, 11:43 AM IST
कुलभषण जाधव यांची पत्नी, आईसोबत उद्या होणार भेट

नवी दिल्ली : हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने कारागृहात बंदिवान बनविलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई उद्या (25 डिसेंबर) भेटणार आहेत.

काही काळच होणार भेट

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई येथे येऊ शकतात. त्यासाठी ते 25 डिसेंबरला विमानाने पाकिस्तानात येऊ शकतात. तसेच, भेट झाल्यावर त्याच दिवशी ते परत भारतात जातील. भारतीय उप उच्चायुक्त हे त्यांच्यासोबत (आई आणि पत्नी) येणारे राजकीय दूत असतील, असेही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यानेही केली पुष्टी

पाकिस्तानचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी ट्विट करून म्हटले आह की, 'भारताने सूचीत केले आहे की, कमांडर कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई 25 डिसेंबरला व्यावसायिक विमानाने पाकिस्तानात येतील. तसेच, जाधव यांची भेट घेऊन त्याच दिवशी ते परत जातील.'

भारतीय उच्चायोगाचा एक अधिकारीही भेटीवेळी उपस्थित राहणार....

दरम्यान, पाकिस्तानने 20 डिसेंबरला जाधव यांची पत्नी आणि आईचा व्हिसा तयार केला होता. पाकिस्तानने आई आणि पत्नीच्या भेटीवेळी भारतीय उच्चायोगाच्या एका अधिकाऱ्यालाही सोबत थांबण्यास मान्यता दिली आहे.