'..तर तिथेही भाजपा येईल', बिहार निकालावर कुणाल कामराचा संताप; ज्ञानेश कुमारांवर थेट प्रहार

Kunal Kamra : बिहार निवडणुकीचे निकाल समोर येत असतानाच या निकालावरून कुणाल कामराने ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 14, 2025, 04:27 PM IST
'..तर तिथेही भाजपा येईल', बिहार निकालावर कुणाल कामराचा संताप; ज्ञानेश कुमारांवर थेट प्रहार

Kunal Kamra on CEC Gyanesh Kumar: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जोरात सुरू असून दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र उभं राहिलं. राज्यभर एनडीए समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना महाआघाडी मात्र बचावात्मक अवस्थेत दिसली. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव दुपारी तीनपर्यंत पिछाडीवर होते.

Add Zee News as a Preferred Source

मतप्रवाह एनडीएच्या बाजूने झुकताना विरोधकांकडून निवडणूक आयोगावर टीका करण्यास सुरुवात झाली. सोशल मीडिया, विशेषत: ‘एक्स’वर याबाबत मोठी चर्चा रंगली. अशातच बिहार निवडणुकीच्या निकालावर कुणाल कामराने देखील आपली प्रतिक्रिया एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटरवर दिली आहे. 

कुणाल कामराची धारदार टीका

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने नेहमीप्रमाणे बिहार निवडणुकीच्या निकालावर तिखट शैलीत प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. एक्सवर केलेल्या त्याच्या पोस्टमध्ये तो म्हणाला की, 'ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपाचे सरकार स्थापन होईल.'

कुमाराने दोन ओळींच्या या व्यंगात्मक पोस्टमधून त्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट टीका केली. या पोस्टला अवघ्या काही तासांत दोन लाखांहून अधिक व्यूज मिळाले असून 1800 पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

AAP नेते संजय सिंहही आक्रमक

अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत नियमितपणे केंद्राविरोधात टीका करणारे आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बिहार निवडणुकीमधील निकालानंतर निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, 'तीन महिन्यांपूर्वीच मी सांगितलं होतं ही निवडणूक भाजपाने पळवली आहे. 'आज फक्त ज्ञानेश कुमार यांनी विजयाचे प्रमाणपत्र पंतप्रधान मोदींना दिले आहे.'

ते पुढे म्हणाले की, 80 लाख मतदार वगळलेल्या राज्यातून आणि 5 लाख दुबार नोंदी असलेल्या यंत्रणेतून येणारे निकाल किती योग्य असतात यावर गंभीर चर्चा होणे आवश्यक आहे. 'भाजपाने आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तोंडात मिठाई चढवली पाहिजे' असं संजय सिंह म्हणाले.  

राजकीय वातावरण तापलं

एकूणच बिहारच्या निकालांकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना एनडीएच्या आघाडीमुळे उत्साह तर विरोधकांच्या नाराजीमुळे निवडणूक आयोगावर जोरदार टीका असं मिश्र वातावरण राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतात आणि या टीकेच्या मालिकेला कोणतं वळण मिळतं हे पाहणं आता अधिक उत्सुकतेचं ठरणार आहे.

FAQ

1. बिहार विधानसभा निवडणुकीत सध्या कोण आघाडीवर आहे?

सुरुवातीच्या मतमोजणीनुसार एनडीएने मोठी आघाडी घेतलेली दिसते. अनेक मतदारसंघांमध्ये एनडीए उमेदवार पुढे आहेत.

2. महाआघाडीची स्थिती कशी आहे?

महाआघाडी बचावात्मक अवस्थेत दिसत असून, तेजस्वी यादव दुपारी तीनपर्यंत पिछाडीवर होते.

3. कुणाल कामराने निकालांवर काय प्रतिक्रिया दिली?

कुणाल कामराने तिखट शैलीत निवडणूक आयोगावर टीका करत म्हटलं—
"ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपाचे सरकार स्थापन होईल."

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More