Paragliding : हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका परदेशी पर्यटकाचा या साहसी खेळामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना पडून एका 30 वर्षीय सूरज शाह याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता गुजरातच्या (Gujarat) मेहसाणा जिल्ह्यातील कादी परिसरात पॅराग्लायडिंग करताना दक्षिण कोरियातील एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिन ब्योन मून असे मृताचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

50 फूटांवरुन कोसळून मृत्यू


पॅराशूटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने शिन यांचा मृत्यू झाला आहे. पॅराशूटच्या अपघातामध्ये शिन यांचा तोल गेला आणि ते 50 फूट उंचीवरून खाली कोसळले. यानंतर शिन यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उंचीवरुन पडल्याच्या  धक्क्याने शिन यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


वडोदरा फिरण्यासाठी आले होते शिन


दक्षिण कोरियावरुन शिन हे वडोदरामध्ये फिरण्यासाठी आले होते. शिन आणि त्यांचे मित्र 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी कादी शहराजवळील विसतपुरा गावात गेले होते. त्यानंतर शिन आणि त्यांचे मित्र पॅराग्लायडिंगला गेले. यावेळी त्यांचा अपघात झाला, अशी माहिती कादी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी निकुंज पटेल यांनी दिली.


याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिन यांच्या वडोदरा येथे राहणाऱ्या आणि दक्षिण कोरियाच्या दूतावासाला याबद्दल माहिती देण्यात आली आहे.


साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू


साताऱ्यातील शिरवळमध्ये राहणारा सुरज शाह आपल्या मित्रांसह मनाली येथे फिरायला गेला होता. पॅराग्लायडींग करताना शेकडो फूट उंचीवरुन तो खाली पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. पॅराग्लायडींग करताना हार्नेसमध्ये गडबड झाल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांनी सूरज आणि पायलटला कुल्लू येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. तर पायलटवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.