गुजरात: बंद खोलीत सापडली 100 कोटींची बेनामी संपत्ती! 87 किलो सोन्याच्या विटा, 11 घड्याळं अन्...

Massive Haul of Gold: बंद खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर अधिकाऱ्यांना समोरचं दृष्य पाहून मोठा धक्काच बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 20, 2025, 11:36 AM IST
गुजरात: बंद खोलीत सापडली 100 कोटींची बेनामी संपत्ती! 87 किलो सोन्याच्या विटा, 11 घड्याळं अन्...
100 कोटींहून अधिक किंमत

Massive Haul of Gold: महसूल गुप्तचर संचालनालयच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना त्याच्या एका मोहिमेदरम्यान घबाड हाती लागलं आहे. सोन्याच्या तसक्रीविरोधात कारवाई करताना डीआरआयला गुजरातमधील अहमदाबाद इथल्या बंद घरात 100 कोटींहून अधिक रुपयांची बेहिशेबी संपत्ती सापडली असून ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या साऱ्या प्रकारासंदर्भात अर्थमंत्रालयाने माहिती दिली आहे.

संयुक्त कारवाई

अर्थमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये सविस्तर माहिती दिली आहे. अहमदाबादमधील पलडी परिसरातील एका बंद फ्लॅटवर केलेल्या छापेमारीमध्ये सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढून आली आहे. सदर कारवाई डीआरआय आणि गुजरातमधील दहशतवादीविरोधी पथकाने संयुक्तरित्या केली आहे. या सर्च ऑपरेशनमध्ये बंद खोलीचं कुलूप उघडून अधिकाऱ्यांनी या बंद असलेल्या खोलीत प्रवेश केल्यानंतर समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला.

घरात काय काय सापडलं?

अधिकाऱ्यांना या बंद खोलीमध्ये 87.92 किलो वजनाच्या सोन्याच्या विटा सापडल्या. या सोन्याची किंमत 80 कोटी रुपये इतकी आहे. यापैकी बहुतांश सोन्याच्या विटांवर परदेशातील मार्किंग दिसून येत आहेत. यावरुनच हे सोनं तस्करीच्या माध्यमातून देशात आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

महागडी घड्याळंही सापडली

या छापेमारीदरम्यान 11 महागडी घड्याळही सापडली आहेत. यामध्ये हिरे जडीत 'पाटे फिलिप' कंपनीच्या घड्याळाबरोबरच जॅकोब अॅण्ड कंपनी टाइमपीस, फ्रँक मुलर या कंपन्यांची घड्याळं आहेत. सोन्याच्या विटांबरोबरच सोन्याचे दागिनेही सापडले असून या दागिन्यांचं वजन 19.66 किलोग्राम इतकं आहे. या दागिन्यांमध्ये महागडे हिरे वापरण्यात आल्याचं दिसत आहे. या दागिन्यांचं मूल्य किती आहे याची चापणी सुरु आहे. या घरातील छापेमारीत 1 कोटी 37 लाख रुपयांची रोख रक्कमही सापडली आहे. सदर छापेमारी ही आर्थिक गुन्हेगारी, फेरफार याविरोधात डीआरआयच्या कारवाईचा एक भाग असल्याचं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे. 

मुंबईमध्येही डीआरआयला मोठं यश

6 कोटी 28 रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली दुबईहून मुंबईला प्रवास करणाऱ्या तीन इराणी नागरिकांना अटक करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी सिंडिकेटच्या चौथ्या सदस्याला अटक केली. दुबईहून मुंबईला 6.28 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली तीन इराणी नागरिकांना अटक करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी सिंडिकेटच्या चौथ्या सदस्याला अटक केली. डीआरआयच्या चौकशीत असे दिसून आले आहे की या सिंडिकेट सदस्यांनी यापूर्वी भारतात 28 कोटी रुपयांच्या किमान 40 किलो सोन्याची तस्करी केली होती.