लोकसभेच्या उमेदवारीसाठी मायावतींना हिरे किंवा रोकड द्यावी लागते; मनेका गांधींचा आरोप

बसपामध्ये कोणालाही फुकट तिकीट मिळत नाही.

Updated: Apr 4, 2019, 10:58 AM IST
लोकसभेच्या उमेदवारीसाठी मायावतींना हिरे किंवा रोकड द्यावी लागते; मनेका गांधींचा आरोप title=

लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या ( बसपा) सर्वेसर्वा मायावती या लोकसभेच्या एका तिकीटासाठी उमेदवारांकडून १५ कोटी रूपये घेतात, असा आरोप भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी केला. त्या बुधवारी उत्तर प्रदेशातील एका सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, सगळ्यांना माहिती आहे की बहुजन समाजवादी पक्ष कोणालाही फुकट तिकीट देत नाही. मायावती फक्त हिरे आणि रोख रक्कमेच्या स्वरुपातच १५ कोटी रुपये स्वीकारतात, असे त्यांच्या पक्षाचे नेतेही सांगतात. मात्र, उमेदवारांकडे इतके पैसे येतात कुठून? याचा अर्थ उमेदवारीसाठी दिलेले १५ ते २० कोटी ते जनतेच्या पैशातून वसूल करणार, असे मनेका गांधी यांनी सांगितले. 

२०१६ साली बसपाच्या रोमी सहानी आणि ब्रिजेश वर्मा या आमदारांनी मायावती यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला होता. विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपासाठी मोठी रक्कम मागितली जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. या आरोपांनंतर या दोन्ही आमदारांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते.

मनेका गांधी यंदा सुलतानपूर आणि त्यांचे पुत्र वरूण गांधी पीलीभीतमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यंदा त्यांच्या मतदारसंघाची अदलाबदल झाली आहे. सुलतानपूर हा उत्तर प्रदेशातील हायप्रोफाईल मतदारसंघ मानला जातो. मनेका गांधी यांच्याविरोधात काँग्रेसने डॉ. संजय सिंह तर महाआघाडीकडून चंद्रभान सिंह हे रिंगणात उतरले आहेत.