Saurabh Murder Case Meerut Update Today: मेरठच्या सौरभ हत्याकांडात रोज नवे खुलासे होत आहेत. तपासादरम्यान सौरभची हत्या करणारी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी पूर्ण योजना आखून हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलीस चौकशीत आरोपींकडून काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. हत्या केल्यानंतर साहिलने 24 तास कापलेलं शीर आणि हात आपल्या घरातील रुममध्ये ठेवले होते. यानंतर तो तिथेच झोपला होता. तर दुसरीकडे सौरभचं शरीर मुस्कानच्या रुममधील बेडच्या बॉक्समध्ये होता. मुस्कान रात्रभर त्या बेडवर झोपली होती.
आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, त्यांना नोव्हेंबर 2024 मध्ये सौरभच्या हत्येची योजना आखली होती. त्याचा काटा काढून दोघांची एकत्र राहण्याची योजना होती. यासाठी त्यांनी नोव्हेंबर महिन्यात ठिकठिकाणी जाऊन प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याला कुठे पुरलं जातं याची माहिती घेतली होती. जेणेकरुन सौरभच्या हत्येनंतर त्याला पुरता येईल आणि कोणाला कळणारही नाही.
२२ फेब्रुवारी 2025 ला मुस्कानने शारदा रोड येथील एका डॉक्टरला आपल्याला सतत नैराश्य येत असल्याचा दावा करत झोपेच्या गोळ्या लिहून घेतल्या. कारण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय झोपेच्या गोळ्या मिळत नाहीत. यानंतर, तिने गुगलवर सर्च केला आणि त्याला झोपेच्या गोळ्यांसह आणखी काही गोळ्यांची माहिती मिळाली. तिने हे स्वतः डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलं. ती तिच्या प्रियकरासोबत खैरनगरला पोहोचली आणि झोपेच्या आणि नशेच्या गोळ्या घेतल्या. दोघांनीही शारदा रोडवरून 800 रुपयांचे दोन मांस कापण्याचे चाकू, 300 रुपयांचा रेझर आणि एक बॅग खरेदी केली. 3 मार्च रोजी सौरभने त्याची आई रेणूच्या घरून भाजी आणली. त्याने मुस्कानला कोफ्ते गरम करायला दिले. मुस्कानने भाज्यांमध्ये झोपेच्या गोळ्या आणि इतर औषधे मिसळली. यानंतर सौरभ झोपी गेला.
सौरभ झोपल्यानंतर मुस्कानने आपला प्रियकर साहिलला फोन करुन घरी बोलावलं. साहिल घरी पोहोचल्यानंतर दोघांनी मिळून चाकूने सौरभची हत्या केली. मृतदेह बाथरुममध्ये नेऊन आधी त्याचं शीर कापण्यात आलं. यानंतर हात आणि बोटं कापण्यात आली. मृतदेह पिशव्यांमध्ये भरुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्याची योजना होती. दोघांनी सौरभचं धड पॉली बॅगमध्ये भरुन डबल बेडच्या बॉक्समध्ये ठेवला.
साहिलने कापलेले डोके आणि मनगटापासून कापलेले हात दुसऱ्या बॅगेत ठेवले आणि ते त्याच्या घरी घेऊन गेला. 4 मार्च रोजी त्याने घरातील एका खोलीत ते ठेवलं, परंतु त्याची विल्हेवाट लावता आली नाही. सौरभचे डोके आणि हात 24 तास साहिलच्या घरीच होते. 5 मार्चला त्याने घंटाघर येथून एक ड्रम विकत घेतला आणि पॉली बॅगमध्ये ठेवलेले धड त्यात ठेवले. काही वेळाने साहिलने डोके आणि हात आणले आणि तेही ड्रममध्ये ठेवले. वर सिमेंट आणि धूळ यांचे मिश्रण टाकून ते भरले गेले आणि ते सीलबंद केलं गेलं.
पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी सांगितलं की, हत्येच्या अनेक दिवस आधी सौरभच्या मद्यात मुस्कानने झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्याय. जेणेकरुन नशेत असताना त्याची हत्या करण्यात येईल. पण या काळात सौरभने मद्यपान केलं नव्हतं.
मुस्कानच्या वडिलांनी तिला फाशी द्यायला हवी अशी मागणी केली आहे. मुस्कानने जगण्याचा अधिकार गमावला आहे. अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही. सौरभने नेहमीच मुस्कानला पाठिंबा दिला असं ते म्हणाले आहेत. दरम्यान आई म्हणाली की जेव्हा सौरभ लंडनला जात होता तेव्हा आम्ही त्याला मुस्कानला आमच्याकडे सोडण्यास सांगितलं होतं. पण मुस्कानला इथं राहायचं नव्हतं. कारण मुस्कानला माहित होतं की तिचे पालक तिला काहीतरी करण्यापासून रोखतील.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान आणि साहिल यांनी सौरभच्या छातीत वार केले आणि नंतर मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि चाकूने त्याचे 15 तुकडे केले. मृतदेह सिमेंटमध्ये इतका खोलवर रुतला होता की संपूर्ण ड्रम शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवावा लागला. पोलिसांनी ड्रम तोडून मृतदेह बाहेर काढला, ज्यामध्ये डोके, दोन्ही हात आणि पायाची बोटे वेगवेगळी आढळली.