भारतीय वायू दलातील मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त

जोधपूर विमानतळावर मिग-२७चा शानदार निरोप समारंभ

Updated: Dec 27, 2019, 10:59 AM IST
भारतीय वायू दलातील मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त  title=
फोटो सौजन्य : एएनआय

जोधपूर : कारगीलमध्ये शत्रूवर वरचढ ठरणारे भारतीय हवाई दलातील मिग-२७ विमानं आज हवाई दलातून निवृत्त होणार आहेत. जोधपूरच्या एअरबेस सेंटरवर मिग-२७ विमानांच्या तुकडीचा शानदार निरोपसमारंभ होणार आहे. सूर्यकिरण विमानांची एक तुकडी मिग-२७ विमानांना चित्तथरारक कसरती करत निरोप देतील. यानंतर केवळ भारतीय हवाई दलातूनच नव्हे तर जगभरातून मिग-२७ विमानं इतिहासजमा होतील.

जोधपूर एयरबेसवर शुक्रवारी सकाळी लढाऊ विमान मिग-२७ च्या एकमेव स्काडर्न स्कॉर्पियोच्या सर्व फायटर जेटने एकत्र उड्डाण केलं. कॅप्टन राव यांच्या नेतृत्वाखाली हे उड्डाण करण्यात आलं. ज्यात ७ MIG-27 विमानांनी शेवटंचं उड्डाण केलं. मिग-२७ ३८ वर्षांपर्यंत देशाच्या सेवेत कार्यरत होतं.

अखेरच्या उड्डाणानंतर मिग विमानं विमानतळांवर उतरतील त्यांनंतर सलामी देऊन त्यांना निरोप देण्यात येईल. मूळ रशियन तंत्रज्ञान असलेल्या, तंत्रज्ञान हस्तांतरण करारानंतर भारताने तयार केलेल्या मिग - २७ ला 'बहादूर' या टोपण नावानेही ओळखले जायचे. 

गेल्या चार दशकांपासून मिग-२७ विमानं भारतीय हवाई दलात कार्यरत होती. जमिनीवर हल्ला करण्याची जवाबदारी या लढाऊ विमानावर होती. १९८१ च्या सुमारास हे लढाऊ विमान भारतीय वायू दलात सोव्हिएत रशियाकडून दाखल झालं. त्यानंतर भारतात १५० पेक्षा जास्त मिग - २७ बनवण्यात आली. कारगिल युद्धात उंच पर्वतांच्या शिखरावर असलेल्या घुसखोरांच्या तळांवर यशस्वी हल्ला करण्याचे काम मिग - २७ ने पार पाडलं होतं.