Monsoon 2025 Weather Update: भारतात मागील काही महिन्यांपासून सातत्यानं हवामान बदल होत असून, यंदाच्या वर्षीचा उकाडा असह्य होताना दिसत आहे. त्यातच आता काही दिवसांनी येणाऱ्या मान्सूनसंदर्भात हवामान विभागानं अतिशय महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडी (IMD) आणि खासगी हवामान संस्था (Skymet) स्कायमेटनं यंदाच्या मान्सूनसंदर्भात पहिला अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्यानं यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आयएमडीच्या अंदाजानुसार यंदा देशात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असून, हा पाऊस जून ते सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत होईल. या पावसाचं प्रमाण सरासरीच्या 106 टक्के असून, ला निनाच्या प्रभावामुळे यंदा देशात मान्सून चांगला राहील. मान्सूनमध्ये व्यत्यय आणणारा अल निनो कमकुवत होणार असून मान्सून येईपर्यंत तो निघून जाईल आणि ला निना पाऊस चांगला पडण्यासाठी गरजेचा आहे.
'स्कायमेट'नं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 2025 मध्ये दक्षिण पश्चिम मान्सूनच यंदाच्या वर्षी सामान्य स्तरावर राहणार असून, जून ते सप्टेंबरदरम्यान देशभरात सरासरी 868.6 मिमी अर्थात 103 टक्के इतक्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यात पाच टक्क्यांची घट किंवा वाढ होऊ शकते असाही प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात स्कायमेटच्या मतेही यंदा पाऊस सामान्य स्थितीतच असेल. दरम्यान मान्सूनच्या वाटेतील आणखी सखोल माहिती हवामान प्रणालीत होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांच्या धर्तीवर हवामान विभागाकडून जारी केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.
जून महिन्यात केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोव्यामध्ये सामान्यहून अधिक आणि मध्य भारतात सामान्य पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात मान्सून अपेक्षित वेळेहून दिरंगाईनं हजेरी लावेल तर, जुलै महिन्यात पश्चिम घाटमाथ्यावर सामान्यहून अधिक पावसाची हजेरी पाहायला मिळेल. स्कायमेटच्या सविस्तर माहितीनुसार यंदा जून महिन्यास सरासरीहून कमी म्हणजेच 69 टक्के पाऊस असेल. तर, जुलै महिन्यात हे प्रमाण 102 टक्के इतकं असेल. ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण 108 टक्के आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104 टक्के पर्जन्यमान राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे.