MP Sanjay Raut: पहलगाम हल्ल्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं.

MP Sanjay Raut: लोकसभा आणि राज्यसभेत पहलगाम हल्ल्यावर चर्चा सुरु आहे. या विषयावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात आलंय. काल लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनीदेखील पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. काय म्हणाले संजय राऊत? सविस्तर जाणून घेऊया.
पहलगाम हल्ल्यासंदर्भात बोलण्यासाठी संजय राऊतांना 4 मिनिटे देण्यात आली. यावरुन राऊतांनी सुरुवातीला आभार मानत खोचक टोला लगावला. पहलगाममध्ये 26 लोकांची हत्या कशी झाली? हे सरकार आतापर्यंत सांगू शकले नाही. काश्मिर केंद्र शासित आहे. तिथले पोलीस केंद्राच्या आदेशाचे पालन करतात. तरीही हल्ला झाला आणि हल्लेखोर निघून गेले. राज्यपालांनी चूक मान्य केली. सुरक्षेत चूक झाल्याचे त्यांनी म्हटलं. चूक झालीय तर जबाबदारी कोण घेणार आणि राजीनामा कोण देणार? पंडीत नेहरु देणार का? डोनाल्ड ट्रम्प देणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यायला हवा, असे संजय राऊत म्हणाले.
तुमचे आदेश पाळत नाहीत म्हणून या देशात उपराष्ट्रपतींकडून तडकाफडखी राजीनामा घेतला जातो. 26 लोकांची हत्या होऊन कोणाचा राजीनामा नाही की माफी नाही, असे राऊत म्हणाले. आमचे पंतप्रधान स्वत:ला इश्वराचा अवतार मानतात. मला वेळेच्या आधी गोष्टी कळतात असे ते म्हणतात. मग दहशतवादी पहलगामवर हल्ला करणार हे तुम्ही कसं ओळखलं नाहीत? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.
मी कालपासून मोठमोठी भाषणं ऐकतोय. राजनाथ सिंह, नड्डा यांना पंडीत नेहरु, सरदार पटेल यांची सारखी आठवण येतेय. पंडीत नेहरु त्यांना झोपायलाही देत नाहीत आणि जगायलाही देत नाहीत. सरदार पटेलांची आठवण येते. सरदार पटेलांना पंतप्रधान न बनवून आपण ऐतिहासिक चूक केलीय. पंतप्रधान नेहरु डेमोक्रॅटीक होते. सरदार पटेल लोहपुरुष होते. सरदार पटेलांना पंतप्रधान न बनवून आपण ऐतिहासिक चूक केली. सरदार पटेलांनी पहिल्यांदा आरएसएसवर बंदीची मागणी केली. सरदार पटेल पंतप्रधान असते तर हे समोरचे लोक दिसले नसते. तुम्ही पंतप्रधान नेहरुंचे आभार मानले पाहिजेत, असे राऊत म्हणाले.
पाकिस्तान आमच्या समोर लोळत होता की युद्धविराम करा. 15 वर्षापासून कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यांना तरी सोडवा, असे राऊत म्हणाले.