#10YearsChallagne: मुकेश अंबानींच्या संपत्तीत १७४ पटींनी वाढ
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुकेश अंबानी यांची पत उंचावली आहे.
नवी दिल्ली: नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे एकीकडे देशातील उद्योजकांना मोठा फटका बसला असताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडील संपत्तीने मात्र नवे शिखर गाठले आहे. ब्लूममर्गने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या दहा वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १७४ पटींनी वाढ झाली आहे. २००९ साली मुकेश अंबानी यांच्याकडे १,१३,९६० कोटी रुपयांची संपत्ती होती. दहा वर्षानंतर हा आकडा ३,११,९६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याची तुलना करायची झाल्यास दहा वर्षात अंबानी यांची संपत्ती १,९८,००५ कोटी रूपयांनी वाढल्याचे दिसून येते.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे रिलायन्स समूहाच्या कंपन्यांच्या समाभागांची किंमत वाढली आहे. याशिवाय, रिलायन्स जिओची दूरसंचार क्षेत्रातील घौडदौड थक्क करणारी आहे. आगामी काळात ई-कॉमर्स क्षेत्रात रिलायन्सकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मुकेश अंबानी यांची पत उंचावली आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा आर्थिक परिषदेसाठी यंदा मुकेश अंबानी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्यावर्षी फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थान पटकावले होते. गेल्या ११ वर्षांपासून ते पहिल्याच क्रमांकावर आहेत.
दरम्यान, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार जगातील १२ धनाढ्यांच्या संपत्तीचा एकत्रितपणे विचार केल्यास गेल्या दहा वर्षात त्यांची संपत्ती १२,४६,४३७ कोटी रुपयांनी वाढली आहे. यापैकी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याच्या संपत्तीचे आकडेही डोळे फिरवणारे आहेत. गेल्या दहा वर्षात मार्क झुकरबर्ग याची संपत्ती १८५३ पटींनी वाढली आहे.