Hotel Oberoi Owner: काही माणसं अनेकदा कर्तृत्त्वानं इतकी मोठी होतात, की त्यांचं मोठेपण इतरांना भारावून सोडतं. आव्हानांना नमवत पुढे जाणाऱ्या या माणसांचं नियतीलाही कौतुक वाटत असावं. अशाच मंडळींमधलं एक नाव म्हणे मोहन ओबेरॉय.
ओबेरॉय होटल्स एंड रिसॉर्ट्सचं नाव तुम्ही ऐकलंच असेल.अशा या समुहाच्या संस्थापकपदी असणाऱ्या मोहन ओबेरॉय यांनी कोणत्याही आर्थिक पाठबळा अभावीसुद्धा भारतीय व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामदिरी केली. बँक खात्यात तुटपुंजी रक्कम, व्यवसायाचा शून्य अनुभव आणि कुटुंबाकडून वारसा हक्कात काहीही मिळालं नसतानाही अवघ्या 50 रुपयांच्या प्रतिमाह पगारावर ओबेरॉय यांनी 25000 कोटी रुपयांच्या हॉटेल चेन व्यवसायाची स्थापना केली.
जवळपास 7 देशांमध्ये पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्ट्स क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या या उद्योगसमुहाच्या कमाईचा आकडा सर्वांचेच डोळे दीपवतो. पण, यामागे कैक वर्षांची मेहनत आहे आणि तीसुद्धा नाकारता येत नाही. पाकिस्तानातून भारतात आलेल्या एका अतिसामान्य तरुणानं क्लर्कची नोकरी करत असतानाच या व्यवसायाचा पाया रचला.
कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी काकांच्या बुट बनवण्याच्या कारखान्यात काम सुरू केलं. पण, भारत- पाकिस्तान फाळणीनंतर फॅक्ट्री बंद पडली आणि त्यांनी शिमला गाठलं. इथंच मोहन ओबेरॉय यांच्या जीवनात नवी पहाट झाली.
शिमल्यात आल्यानंतर अर्थार्जनासाठी त्यांनी एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी केली. तिथं त्यांचं काम पाहत मालकानं त्यांच्यावर हिशोबाचं काम सोपवलं. शिमल्यातील सेसिल हॉटेलमध्ये काम करताना त्यांनी या क्षेत्राला अतिशय जवळून अनुभवलं. या नोकरीदरम्यान त्यांना 50 रुपये प्रतिमाह इतका पगार दिला जात होता. याच पगारावर सर्वकाही अवलंबून होतं. ओबेरॉय यांनी आपल्या कामाच्या बळावर ब्रिटीश मॅनेजरवर कमाल प्रभाव पाडला. मेहनतीच्या बळावर प्रचंड काम करत ते मोठे झाले.
काही वर्षांनंतर जेव्हा त्या ब्रिटीश मॅनेजरनं एक हॉटेल खरेदी केलं तेव्हा त्यानं ओबेरॉय यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी बोलवून घेतलं आणि साऱ्या हॉटेलची जबाबजदारी त्यांच्यावर सोपवली. आपली सर्व मेहनतीची कमाई आणि पत्नीचे दागिने विकून त्यांनी 1934 मध्ये तेच हॉटेल खरेदी केलं तिथं ते पहिल्यांदा काम करत होते. इथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांचा हा नवा व्यवसाय अतिशय वेगानं पुढे जाऊ लागला. ‘द क्लार्क होटल’ (The Clarkes Hotel) असं त्यांच्या हॉटेलचं नाव. या हॉटेलच्या कमाईच्या बळावर मोहन सिंह ओबेरॉय यांनी आपलं सर्व कर्ज फेडत कोलकाता इथं 500 खोल्यांचं आणखी एक हॉटेल खरेदी केलं आणि पुढे एसोसिएटेड हॉटेल्स ऑफ इंडिया (AHI) च्या शेअरमध्ये गुंतवणूक केली.
शिमला, दिल्ली, लाहोर, मुर्री, पेशावर, रावळपिंडी अशा ठिकाणची कैक हॉटेलं या समुहाच्या अख्तयारित होती. 1943 मध्ये या समुहाची धुरा त्यांच्या हाती आली आणि ते देशातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनचे मालक झाले. त्यांनी 1965 मध्ये द ओबेरॉय इंटरकॉन्टिनेंटल आणि 1973 मध्ये मुंबईत 35 मजली ओबेरॉय शेरेटन उभारत एक नवी उंची गाठली. आजच्या घडीला 32 देशांमध्ये त्यांच्या या उद्योगसमुहाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. 2002 मध्ये वयाच्या 103 व्या वर्षी मोहन सिंह ओबेरॉय यांनी जगाचा निरोप घेतला. ज्यानंतर त्यांच्या मुलाच्या खांद्यांवर या व्यवसायाची धुरा सोपवण्यात आली. सध्याच्या घडीला याच कंपनीचं मार्केट कॅप 25000 कोटी रुपयांहूनही अधिक आहे. त्यामुळं शून्यातून सुरुवात केलेल्या या समुहाचा अनेकांनाच हेवा वाटतो.