कर्नाटकात सैराट चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. 6 ते 7 मुस्लीम तरुणांनी लॉजमधील रुममध्ये घुसून एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी  हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त असून, सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हावेरी जिल्ह्यात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. पीडितांनी पोलिसांकडे धाव घेत सगळा घटनाक्रम उलगडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. 


आरोपी तरुणांना आंतरधर्मीय जोडपं हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी रुम गाठली. त्यांनी दरवाजा ठोठावून त्यांना उघडायला लावला. दरवाजा उघडताच त्यांनी दोघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी तरुणीलाही सोडलं नाही. यानंतर ते त्यांना रुममधून रस्त्यावर फरफटत घेऊन गेले. हा सगळा प्रकार ते आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. 



हावेरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) अंशू कुमार यांनी सांगितलं आहे की, “दोन जणांना अटक करण्यात आली असून आम्ही आरोपींची ओळख पटवत आहोत. आम्ही लवकरच आणखी तीन ते चार जणांना अटक करू.” दरम्यान आरोपी हे कोणत्याही संघटनेशी संबंधित नसून, स्थानिक असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 


“सुरुवातीला हा प्राणघातक हल्ला होता आणि आम्ही दोघांना अटक केली. तथापि, पीडितांच्या वक्तव्याच्या आधारे, आम्ही अपहरण, महिलेचा विनयभंग, महिलेवर हल्ला करणे आणि खुनाचा प्रयत्न यासारखे कलमे जोडण्याचा विचार करत आहोत," अशी माहिती अंशू कुमार यांनी दिली आहे.