Nana Patole: विधानसभा निडवणुकीच्या निकालानंतर दिवसागणिक काँग्रेसमधली धुसफूस वाढतच चालली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसमधील नेत्यांनीच नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय. विधानसभेतल्या काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आता नाना पटोले टार्गेट होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय. काँग्रेसच्या दारूण पराभवनंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्याच नेत्यांनी निशाणा साधलाय. नाना पटोले हे RSSचे एजंट आहेत. पटोलेंनी पैसे घेऊन तिकीटं वाटली, असे गंभीर आरोप काँग्रेसचे नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी केलेत. पटोले यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही शेळकेंनी दिलाय.


या खळबळजनक आरोपांनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी चक्क बंटी शेळकेंचच कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. बंटी शेळके लढवय्ये नेते आहेत. आरएसएसच्या गडात ते खिंड लढवताहेत अशा शब्दात वडेट्टीवारांनी बंटी शेळके यांचं कौतुक केलंय. 


विधानसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाचं खापर नाना पटोले यांच्या माथी फोडलं जातंय. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत नाना पटोले हटाव मोहीम राबवली जात असल्याचं बोललं जातंय. निवडणुकीत काही चुका झाल्या असून त्या हायकमांडच्या कानावर टाकण्यात आल्या, असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. मात्र या मोहीमेत आपला सहभाग नाही, हे सांगण्यासही वडेट्टीवार विसरले नाहीत.


नाना पटोले यांनी मात्र ह्या सर्व आरोपांवर फारसं बोलणं टाळलंय. तो पक्षाचा विषय आहे. त्यावर योग्य ठिकाणी स्पष्टीकरण देईन, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.


काँग्रेसनं नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यात विधानसभा निवडणूक लढवली. शंभरहून अधिक जागा लढवणा-या काँग्रेसला केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसच्या पिछेहाटीला जबाबदार धरुन नानांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागलीय.


विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वात बदल होणार?


काँग्रेसच्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. त्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी निकालानंतर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली होती.तर,  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस हायकमांडकडे राजीनामा देणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली. नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चेचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पटोलेंच्या राजीनाम्या संदर्भात माहिती नसल्याचं म्हटलंय.दरम्यान काँग्रेस हायकमांडच्या अतितातडिच्या आदेशानंतर अमित देशमुख तातडीने मुंबईकडे रवाना झालेत. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित देशमुख यांकडे येण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.  दुसरीकडं नाना पटोले मात्र राजीनाम्याच्या बातम्यांना पुर्णविराम दिलाय. आपण राजीनामा दिला नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.तर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या सुरू असलेल्या चर्चेत भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांनी उडी घेत नाना पटोले यांना टोला लगावलाय. विजयाचे वाटेकरी अनेक असतात मात्र पराभव अनाथ असतो असं म्हटलं जातं. तशीच काहीशी परिस्थिती काँग्रेसची झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे काँग्रेस हायकमांड नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.विधानसभेचा निकाल लागताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय. ज्यांनी त्रास दिलाय ते सगळे साफ झाले. लातूरमध्ये एक पडला दुसरा तर दुसरा निसटता निसटता जिंकला, अशा शब्दांत त्यांनी देशमुख बंधूंवर टीका केलीय. तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सगळे साफ झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पराभव होतं होता. मात्र  थोडक्यात जिंकले, असा निशाणा पटोलेंवर साधलाय.