'अंबानी आहेस की भिकारी,' शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा 'तो' काळ

भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी असतानाही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपली मुलं आकाश, इशा आणि अनंत यांना आर्थिक शिस्त लावली होती.   

शिवराज यादव | Updated: Mar 27, 2025, 07:57 PM IST
'अंबानी आहेस की भिकारी,' शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा 'तो' काळ

अंबानी कुटुंबाची गणना भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये केली जाते. त्यांचं घर, राहणीमान, कार्यक्रम यातून त्यांचा राजेशाही थाट नेहमीच सर्वांना दिसत असतो. त्यांच्या घरातील विवाहसोहळ्यांच्या माध्यमातून ही श्रीमंती फक्त भारत नाही तर संपूर्ण जगाने अनुभवली आहे. पण असं असलं तरी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपली मुलं आकाश, इशा आणि अनंत यांना मध्यमवर्गीयांप्रमाणे वाढवलं. मुकेश अंबानी यांची मुलं असल्याने त्यांना शिकत असताना भरपूर पॉकेट मनी मिळत असणार असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण हे खऱं नाही. 

एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी अनंत अंबानीच्या बालपणीचा किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्यांनी मुलांना पैशांचं महत्त्व कळावं यासाठी आपण त्यांनी खर्चासाठी फार कमी पैसे द्यायचो हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, "जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा मी त्यांना दर शुक्रवारी शाळेच्या कँटीनमध्ये खर्च करण्यासाठी 5 रुपये द्यायची. एके दिवशी अनंत धावत माझ्या रुममध्ये आला आणि मला 5 च्या ऐवजी 10 रुपये देण्याची मागणी केली. मी जेव्हा त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने सांगितलं की, मी जेव्हा कधी खिशातून 5 रुपये काढतो तेव्हा माझे मित्र माझ्यावर हसतात आणि म्हणतात, 'अंबानी आहे की भिकारी'. ते ऐकल्यावर मला आणि मुकेश यांना हसू आवरत नव्हतं".

नीता अंबानी यांचं बालपण

नीता अंबानी यांनी त्यांच्या बालपण आणि संगोपनाबद्दलही सांगितलं. त्यांनी त्यांच्या पालकांसोबतच्या आठवणी सांगितल्य त्यांची आई शिस्तप्रिय होती. त्यांना वर्षातून फक्त चार वेळा बाहेर जाण्याची परवानगी देत ​​असे आणि बालपणात त्यांना पॉकेट मनी देत नसत.

मुकेश अंबानी वडील म्हणून कसे आहेत?

नीता अंबानी यांनी मुकेश अंबानी यांच्या वडिलांच्या भूमिकेबद्दलही सांगितलं. जेव्हा ते रिलायन्सच्या उभारणीत व्यस्त होते तेव्हा त्यांनी त्यांना त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवण्यास सांगितलं. "मी त्यांना सांगितले की तुम्ही रिलायन्स आणि देशाच्या भविष्यावर प्रभाव पाडण्यात व्यस्त असाल, परंतु तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यावर देखील चांगले प्रभाव पाडायला हवा. मला वाटतं की केवळ गुणवत्ताच नाही तर मुलांसोबत घालवलेल्या वेळेचे प्रमाण त्यांना चांगले व्यक्ती बनवते," असं त्यांनी म्हटलं.

इशा अंबानीने सांगितलं तिच्या बालपणीच्या आठवणी

इशा अंबानीनेही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या पालकत्वाबद्दल आधीच्या मुलाखतीत खुलासा केला होता. "आश्चर्यकारक सत्य हे आहे की माझे पालक जरी अत्यंत व्यस्त असले तरी ते खरोखरच प्रत्यक्ष सहभागी होते. माझा जन्म 1991 मध्ये झाला, उदारीकरणानंतर लगेच, जो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक वास्तविक वळणबिंदू होता. भारतीय कंपन्या जागतिक स्तरावर स्वप्न पाहू शकण्याची ही पहिलीच वेळ होती. मी माझ्या वडिलांना त्यांच्या स्वप्नाचा पाठलाग करताना आणि रिलायन्सला उभं करण्यासाठी कठोर परिश्रम करताना पाहिलं. ते कित्येक तास काम करत असले तरी, जेव्हा आम्हाला त्यांची गरज असायची तेव्हा ते नेहमीच तिथे असायचे. घरी, आमचे पालक ज्या मूल्यव्यवस्थेत वाढले त्याच मूल्यव्यवस्थेत आम्हाला वाढवलं ​​गेलं. त्यांनी खात्री केली की आम्हाला पैशाचे, कठोर परिश्रमाचे आणि नम्रतेचे मूल्य समजलं पाहिजे," असं तिने सांगितलं होतं.