मुंबई : देशात ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आतापर्यंत देशातील तब्बल 12 राज्यात ओमायक्रॉनने हात पाय पसरले आहेत. आज दिल्ली आणि केरळमध्ये नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत आज नवे 4 ओमायक्रॉन रुग्ण आढळले. यामुळे दिल्लीत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या एकूण 26 इतकी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत आज आढळलेल्या चारही रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 रुग्णांपैकी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


केरळातही चार नवे रुग्ण
दिल्लीनंतर केरळातही ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळले आहेत. केरळात आता ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकुण संख्या 15 इतकी झाली आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणं
देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 161 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सर्वात जास्त ओमायक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 54 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये 26, तेलंगणात 20, राजस्थानमध्ये 17, कर्नाटक 14, गुजरात 9, केरळात 15 आणि उत्तर प्रदेशमध्ये 2 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आंध्रप्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. 


गुजरातमध्ये नाईट कर्फ्यूत वाढ
देशात ओमायक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेता गुजरात सरकारने राज्यात 8 मोठ्या शहरात नाईट कर्फ्यूमध्ये 31 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे.


देशात कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या चोवीस तासात 6 हजार 563 नवे कोरोना रुग्ण सापडले. तर 132 जणांचा मृत्यू झाला. रविवारीच्या तुलनेत मृतांच्या आकडेवारीत घट झाली आहे. रविवारी कोरोनामुळे 264 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या चोवीस तासात 8 हजार 77 जणांना कोरोनावर मात केली. देशात सध्या 82 हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत.