Operation Sindoor मधे युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार; 100 दहशतवाद्यांचा खात्मा; DGMO ने दिले पुरावे

Operation Sindoor: भारताच्या हल्ल्यात युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार झाल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 11, 2025, 07:25 PM IST
Operation Sindoor मधे युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार; 100 दहशतवाद्यांचा खात्मा; DGMO ने दिले पुरावे

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे. भारताच्या हल्ल्यात युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तिन्ही सशस्त्र दलांची आज पत्रकार परिषद पार पडली असून, यावेळी सॅटेलाईट फोटो दाखवत पुरावे सादर करण्यात आले. या फोटोंमधून भारताने केलेली कारवाई आणि पाकिस्तानचं झालेलं नुकसान याचे पुरावे मिळाले आहेत.

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं की, "सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या छावण्या आणि प्रशिक्षण स्थळांची ओळख पटवण्यात आली होती. तिथे अशी अनेक ठिकाणं असल्याचं आमच्या लक्षात आलं. यामधील अनके ठिकाणं आता रिकाम झाली होती. हल्ल्याच्या भीतीने ती आधीच रिकामी करण्यात आली होती. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं, ज्यामधून नागरी वस्ती वगळण्यात आल्या होत्या. गुप्तचर यंत्रणांनी 9 दहशतवादी स्थळांची ओळख पटवली होती. त्यापैकी काही पीओजेकेमध्ये होते, तर काही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात होते. लष्कर-ए-तैयबाचे केंद्र असलेल्या मुरीदकेसारख्या ठिकाणांनी गेल्या काही वर्षांत अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसारखे दहशतवादी जन्माला घातले आहेत."

पुढे त्यांनी सांगितलं की, "9 दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यात आयसी 814 च्या अपहरणात आणि पुलवामा बॉम्बस्फोटात सहभागी असलेले युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे दहशतवादीही मारले गेले. त्यानंतर लगेचच पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलं आणि नागरी वस्ती असलेल्या गावांवर आणि गुरुद्वारांसारख्या धार्मिक स्थळांवर हल्ला केला. ज्यामुळे दुर्दैवाने जीवितहानी झाली. भारतीय हवाई दलाने यापैकी काही छावण्यांवर हल्ला करून या हल्ल्यांमध्ये मोठी भूमिका बजावली. भारतीय नौदलाने शस्त्रसाठ्यासंदर्भात अचूक माहिती दिली".

मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला 

हवाई दलाचे महासंचालक एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी सांगितलं की, "परिस्थिती सध्या फार कठीण आहे, आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायची नव्हती. परंतु ती घेणं आवश्यक होती. भारतीय हवाई दलाने मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. ही दोन्ही ठिकाणं आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत होती, म्हणून त्यांची निवड करणं धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचं होतं. अचूक हल्ल्यांसाठी हवाई दलाने सॅटेलाईट आणि गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे अचूक शस्त्रास्त्रांचा वापर केला". 

'फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केले'

"भारतीय हवाई दलाने अतिशय काळजीपूर्वक फक्त दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं आणि कोणत्याही नागरिकाला हानी होऊ दिली नाही. आम्ही संपूर्ण योजना अशा प्रकारे बनवली होती की फक्त दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ला केला जाईल आणि कोणत्याही नागरी वस्तीचं नुकसान होणार नाही," असंही त्यांनी सांगितलं. 

पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले: डीजीएमओ

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, पाकिस्तानने यापूर्वी भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे अनेक प्रयत्न केले होते, परंतु हे प्रयत्न बहुतेक अयशस्वी झाले. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने वेळीच हे सर्व धोके हाणून पाडले.

'पाकिस्तानातील मुरीदके येथे दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त'

एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, भारतीय हवाई दलाने अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानातील मुरीदके येथील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला. हा तोच परिसर आहे जो लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा बालेकिल्ला मानला जातो.

'बहावलपूरमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त'

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बहावलपूरमधील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. हा भाग जैश-ए. मोहम्मदचा मुख्य तळ मानला जातो. येथे अनेक दहशतवादी कारवायांचे कट आखण्यात आले होते. या हल्ल्याचे ड्रोन आणि सॅटेलाइट फुटेज सादर सादर करण्यात आले, ज्यामध्ये नुकसान दिसत आहे. 

'पाकिस्तानी गोळीबाराने कोणतेही नुकसान नाही'

भारतीय हवाई दलाचे डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, 7 मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचं कोणतेही नुकसान झाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सक्रिय आणि सतर्क होती. आम्ही तयारीत असल्याने पाकिस्तानी हल्ल्यातून कोणतंही नुकसान झाले नाही. आम्ही प्रत्येक संभाव्य धोक्याला वेळीच हाणून पाडलं.