मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर येथून हनिमूनला गेलेलं एक जोडपं 23 मे रोजी मेघालयातून (Meghalaya) बेपत्ता झाल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण देशभरात चर्चेला आलं होतं. 11 दिवसांनी पोलिसांना पतीचा मृतदेह सापडल्यानंतर हे गूढ आणखी वाढलं होतं. दरम्यान पत्नी सोनम रघुवंशीने पतीच्या हत्येप्रकरणी अखेर आत्मसमर्पण केलं आहे. सोनमने एका ढाबा चालकाच्या फोनवरुन आपल्या कुटुंबाशी संवाद साधला. साहिल यादव असं या ढाबा चालकाचं नाव असून, त्याने नेमकं काय झालं होतं याचा खुलासा केला आहे. सोनम कुटुंबाला फोन केल्यानतंर रडत होती असं त्याने सांगितलं आहे. तसंच ती मानसिकदृष्ट्या ठीक नव्हती असंही म्हटलं आहे.
साहिल यादवने त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा उलगडा करताना सांगितलं की, "सोनम येथे आली आणि ग्राहकांकडे मदत मागू लागली. यानंतर ती माझ्याकडे आली आणि कुटुंबीयांना कॉल करण्यासाठी माझा फोन मागितला. मी तिला माझा मोबाईल दिला. आपल्या कुटुंबाशी बोलताना ती रडू लागली. मी तिच्या कुटुंबीयांशी बोललो आणि जागेची माहिती दिली. यानंतर फोन कट झाला".
साहिल यादवने यावेळी सोनमला पाणी दिलं असल्याची माहिती दिली. सोनम यादरम्यान एकटीच होती. "काही वेळाने तिच्या भावाने फोन केला आणि स्थानिक पोलिसांना फोन करुन ती नेमकी कुठे आहे याची माहिती देण्यास सांगितलं. रात्री 2-2.30 च्या सुमारास पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं," असं त्याने सांगितलं.
सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातून शोधून ताब्यात घेण्यात आलं. रविवारी रात्री उशिरा तिने नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना, पोलिस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) डाल्टन पी मारक यांनी सांगितलं की, "सोनमने काल रात्री दबावाखाली आत्मसमर्पण केलं, ज्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या चार झाली आहे. एक आरोपी अजूनही बेपत्ता आहे. न्यायालयीन कार्यवाहीसाठी सोनमला मेघालयात परत आणलं जाईल."
सोनमच्या विवाहबाह्य संबंधातून राजाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहाच्या सोबतीने हत्येची योजना आखली होती. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
राज हा सोनमचा कर्मचारी होता आणि ते फोनवरुन फार बोलायचे असं राजा रघुवंशीचा भाऊ विपुल रघुवंशीने सांगितलं आहे. मी राज कुशवाहाला पाहिलेलं नाही, मी फक्त त्याचं नाव ऐकलं आहे असं तो म्हणाला आहे.
राजा आणि सोनमचे 11 मे रोजी लग्न झालं आणि 20 मे रोजी ते मेघालयात हनिमूनसाठी निघाले. त्यानंतर एक दिवस ते राजधानी शिलाँगमध्ये होते. 23 मे रोजी, एका होमस्टेमधून बाहेर पडल्यानंतर, दोघेही बेपत्ता झाले. त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर जवळच्या गावात सोडून दिलेली आढळली.
अनेक दिवसांच्या शोधानंतर, 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत सापडला. पोलिसांना राजाच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार, चाकू देखील सापडला. दोन दिवसांनंतर, पोलिसांना एक रक्ताचे डाग असलेला रेनकोट सापडला, जो आकाराने खूप मोठा होता. त्यामुळे बेपत्ता पत्नी सापडण्याची आशा निर्माण झाली.
8 जूनपर्यंत सोनमचा पत्ता लागला नाही, त्यानंतर तिने तिच्या भावाला फोन केला आणि त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तिला घेऊन गेले.