Pahalgam Terror Attack: 'आम्हाला लष्कराची गरज नाही, त्या...', काश्मीरमधील आदिल हुसेनच्या आईचा आक्रोश

Pahalgam Terror Attack: आदिल हुसेनची (Adil Hussain) मावशी सलीमाने सांगितलं आहे की, त्याने एका दहशतवाद्याची बंदुक पकडली होती. यावेळी एक गोळी त्याच्या हाताच्या आरपार गेली. यानंतर त्याने खेचरावरुन आणलेल्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दहशतवाद्यांनी पाठीमागून त्याला गोळी घातली जी छातीतून बाहेर पडली.   

शिवराज यादव | Updated: Apr 24, 2025, 08:11 PM IST
Pahalgam Terror Attack: 'आम्हाला लष्कराची गरज नाही, त्या...', काश्मीरमधील आदिल हुसेनच्या आईचा आक्रोश

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्याचं नाव सय्यद आदिल हुसेन असून पर्यटकांना खेचवरुन अवघड प्रदेश ओलांडून बैसरनमधील मैदानात पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करत होता. दहशतवादी आजूबाजुच्या जंगलातून बाहेर पडून गोळीबार करत असताना, आदिलने काही पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याच्या बहिणीने सांगितलं आहे की, तो काही दिवस सुट्टीवर जाणार होता आणि हा त्याच्या कामाचा शेवटचा दिवस होता. 

आदिल हुसेनची (Adil Hussain) मावशी सलीमाने सांगितलं आहे की, त्याने एका दहशतवाद्याची बंदुक पकडली होती. यावेळी एक गोळी त्याच्या हाताच्या आरपार गेली. यानंतर त्याने खेचरावरुन आणलेल्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दहशतवाद्यांनी पाठीमागून त्याला गोळी घातली जी छातीतून बाहेर पडली. 

"ते (दहशतवादी) माणसं नाहीत, हे लाजिरवाणे आहेत. त्यांना आमच्या स्वाधीन केलं पाहिजे. आम्हाला कोणत्याही सैन्याची गरज नाही. फक्त त्यांना आमच्या स्वाधीन करा. एकतर आम्ही मरु किंवा ते मरतील. त्यांनी सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या एका तरुण मुलीला विधवा केलं आहे. तीदेखील माझ्या मुलीसारखी आहे. कोणत्या घृणास्पद कुटुंबातून ते येतात हे माहिती नाही," असं ती म्हणाली.

त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला कुटुंबीयांना त्यांचा मुलगा कुठे आहे हे माहित नव्हतं. त्याचा फोन बंद होता आणि हल्ल्याची बातमी मिळाल्यापासून त्यांचा धावाधाव सुरु होती. कारण त्यांना याच मार्गावर तो काम करत असल्याची कल्पना होती. 

जर त्यांच्या मुलाने पर्यटकांना मदत करण्याचा प्रयत्न केला नसता तर आज वाचला असता का असं विचारलं असता, त्याचे वडील हैदर शाह म्हणाले, "आम्हाला आमच्या मुलाबद्दल तितके दुःख नाही, जितके त्या पर्यटकांबद्दल आहे. इतके लोक मृत्यूमुखी पडले आहेत". 

"ती मुलगी जिचं सहा दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. दुसऱ्या मुलीने तिचे वडील गमावले. लोकांनी त्यांची मुले गमावली. ते निर्दोष होते. त्यांना वाचवताना माझ्या मुलाने आपला जीव गमावला. त्याचा आम्हाला अभिमान आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

आदिल हुसेनची कुटुंबातील एकमेक कमावता असल्याने कुटुंबासमोर काही अडचणीही आल्या आहेत. "त्याचे वडील आणि मी दोघेही आजारी आहेत आणि मीही," त्याची आई म्हणाली. "आता कोण काळजी घेईल? या मुलीचे लग्न करायचं आहे,"