Palace In India: भारतीय इतिहासात (Indian History) डोकावलं असता अनेक असे संदर्भ आढळतात जे कायमच भारावून सोडतात. राजेमहाराजांची संस्थानं, त्यांची श्रीमंती, तेथील रुढी आणि परंपरा पाहताना डोळे दीपतात. राजेशाही थाट पाहताना कायमच या राजेरडवाड्यांच्या प्रासादाची अर्थात त्यांच्या आलिशान महालांचीसुद्धा तितकीच चर्चा होते. अशा या भारत देशामध्ये प्रत्येक महालाच्या निर्मितीमागे एक ना एक कथा- कहाणी आहे. त्यातल्याच एका महालाविषयी इथं जाणून घेऊया, ज्याचा उल्लेख अनेकदा अपशकुनी किंवा एक दुर्दैवी महाल म्हणून केला जातो.
मध्य प्रदेशातील दातिया इथं हा महाल असून त्याचं नाव आहे सतखंडा महाल ( Datia Satkhanda Palace). पाहताक्षणी डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या महालाकडे 400 वर्षांपासून फार क्वचितच कोणी फिरकतं. इथं आजवर कोणी वास्तव्यही केलं नाही, ज्यामुळं हा अपशकुनी महाल असल्याचं अनेकजण म्हणतात. महाराज बीर सिंह देव यांनी या महालाची उभारणी केली पण, त्यांच्या कुटुंबानं कधीच या महालाचा वापर मात्र केला नाही.
सतखंडा महालाच्या निर्मितीसाठी कोणत्याही लाकूड अथवा लोखंडाचा वापर झालेला नाही. इतकंच नव्हे, तर या महालाच्या 7 पैकी दोन मजले पाण्याखाली आहेत. 1620 मध्ये दतियाचे राजा बीर सिंह यांनी 35 लाख रुपये खर्चून हा महाल उभारला होता. या महालातील अतिशय बारीक नक्षीकामामुळं त्याच्या पूर्णत्वासाठी तब्बल 9 वर्षांचा काळ गेला. या महालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं मंदिर आणि मशीदही आहे.
440 खोल्या, शेकडो खिडक्या आणि झरोके असणारा हा महाल मुघल शासक जहांगीरच्या स्वागतासाठी त्याची उभारणी करण्यात आली होती. असं म्हणतात की राजा बीर सिंह देव यांनी शहाजहांला सिंहासनारुढ होण्यासाठी प्रचंड मदत केली होती. ज्या कारणानं या राजाच्या वाट्याला ओरछाचं सिंहासन आलं. जहांगीर इथं आला तेव्हा त्यानं फक्त एका रात्रीचा मुक्काम या महालात केला होता. तेव्हापासून हे महाल निर्मनुष्यच आहे. या महालाची प्रत्येक कमान, प्रत्येक चौक आणि महालातील प्रत्येक नक्षी इतिहासाची साक्ष देत असून, अद्वितीय कलेचं प्रदर्शन करते. पण, इथं कोणाचाही वावर नसल्यामुळं काळानुरुप या महालाकडे पाहण्याचा अनेकांचाच दृष्टीकोन बदलला.