Black Dog Circling Lord Bholenath Bhairav Baba Temple: बिहारमधील गया जिल्ह्यामध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका मंदिरामध्ये एका कुत्र्याने केलेली कृती सध्या चर्चेत आहे. हा कुत्रा देवाचा भक्त असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. येथील शिव मंदिरामध्ये आणि भैरव बाब मंदिरात तब्बल 36 तास प्रदक्षिणा घालत होता असं सांगितलं जात आहे. या कुत्र्याला एवढ्या वेळ प्रदक्षिणा घालताना पाहून स्थानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आधी लोकांना हा कुत्रा पिसाळलेला आहे असं वाटलं. मात्र तो न थांबता सातत्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा कुत्रा मंदिराला प्रदक्षिणा का घालत असेल याची चर्चा सध्या पंचक्रोषीत सुरु आहे.
हा कुत्रा ज्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालत होता ते माँ मंगळागौरी मंदिराच्या अगदी समोरचं शिव मंदिर आहे. या मंदिरामध्ये भैरव बाबांची मूर्तीही आहे. स्थानिक या मंदिराला भैरव बाबाचं मंदिर म्हणतात. भक्त ज्याप्रमाणे या मंदिराला प्रदक्षिणा घालतात त्याचप्रमाणेच हा काळा कुत्रा मंदिराला प्रदक्षिणा घालत होता. दरम्यान हा कुत्रा सतत प्रदक्षिणा घालताना दम लागल्यावर काही वेळ विश्रांतीही घेत होता. काही वेळ थांबल्यानंतर हा कुत्रा परत प्रदक्षिणा सुरु करत होता. हे सारं पाहून भक्तही गोंधळून गेले.
मंगळागौरी मंदिरातील पुजारी आकाश गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान भोलेनाथ भैरव बाबा मंदिरामध्ये हा कुत्रा त्यांची भक्ती व्यक्त करत आहे. अशी अनोखी आस्था फार कमीवेळा पाहायला मिळते. जे लोक धर्माकडे पहाताना त्यातील चमत्कारिकांनी थक्क होतात त्यांच्यासाठी हे सारं भारावून टाकणारं आहे. एखाद्या प्राण्याने अशाप्रकारे मंदिरामध्ये मनुष्याप्रमाणे प्रदक्षिणा घालणं हे फारच दुर्मिळ असल्याने लोकांना यांचं आश्चर्य वाटत आहे.
आधीच्या जन्मातील गोष्टी या जन्मामध्ये टाळता येत नाहीत असं आकाश गिरी सांगतात. अशाचप्रकारे या कुत्र्याचं काहीतरी कनेक्शन अशावं. त्यामुळेच तो अचानक मागील 2 दिवसांपासून भगवान भोले शंकर भैरव बाबा मंदिराला प्रदक्षिणा घालत आहे, असंही आकाश गिरी म्हणाले. एक कुत्रा अशाप्रकारे प्रदक्षिणा घालत असल्याचं समजल्यानंतर शहरभरातून भक्त या कुत्र्याला पाहण्यासाठी मंदिराच्या आवारामध्ये गर्दी करत आहेत. या कुत्र्याला पाहून साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतोय. सुरुवातीला अनेकांनी या कुत्र्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र हा कुत्रा थांबण्याचं नाव घेत नसून भक्तांसाठी तो चर्चेचा विषय ठरतोय.