Video: `इस्रो`च्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना मोदींचा कंठ दाटला! नमस्कार करत...
PM Modi Gets Emotional Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्रीसवरुन थेट बंगळुरुमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांनावर कौतुकाचा वर्षाव करताना मोदींचा कंठ दाटून आला.
PM Modi Gets Emotional Video: पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज ग्रीस दौऱ्यावरुन थेट बंगळुरुमध्ये दाखल झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली त्या दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी परदेशात होते. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला त्यावेळी मोदी 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्गमध्ये होते. त्यानंतर ते ग्रीस दौऱ्यावरुन थेट आज बंगळुरुमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी आले. यावेळी वैज्ञानिकांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला.
उतावळेपणा...
"नमस्कार मित्रांनो! तुम्हा सर्वांमध्ये येऊन एक वेगळाच आनंद होत आहे. असा आनंद फार कमी वेळा मिळतो. असे फार कमी क्षण असतात जेव्हा तन, मन आनंदाने भरुन गेलेलं असतात. अनेकदा अशा घटना घडतात की आपण फार अस्वस्थ होतो. माझ्याबरोबर आता असेच झाले आहे. एवढा उतावळेपणा...' असं म्हणताच टाळ्या वाजल्या.
कंठ दाटून आला...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत इस्रोचे अध्यक्ष असलेले एस. सोमथान यांनी केलं. त्यानंतर मोदींनी या मोहिमेसंदर्भात सविस्तर माहिती वैज्ञानिकांकडून समजून घेतली. मोदींनी यानंतर येथील शास्त्रज्ञांना संबोधित केलं. 'मी दक्षिण आफ्रिकेमध्ये होतो. ग्रीसमधील कार्यक्रमाला गेलो होतो. मात्र माझं मन तुमच्याबरोबरच होतं. कधी कधी वाटतं की मी तुमच्याबरोबर अन्याय करतो. उतावळेपणा माझा आणि त्रास तुम्हाला. पहाटे पहाटे तुम्हा सर्वांना इथं यावं लागलं," असं म्हणत मोदी हसू लागले. यानंतर पुढे बोलताना, "एवढा ओव्हर टाइम. पण मनात होतं की यावं आणि तुम्हाला नमन करावं. तुम्हाला त्रास झाला असेल. पण मी भारतात..." एवढं बोलून मोदींचा कंठ दाटून आलं. आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान थोड्यावेळ थांबले आणि त्यानंतर त्यांनी पुढे भाषण सुरु ठेवलं.
गहिवरले
"मी भारतात आल्या आल्या लवकरात लवकर मला तुमचं दर्शन करायचं होतं," असं मोदी पुढे म्हणाले. "तुम्हा सर्वांना माला सॅल्यूट करायचा होता," असं म्हटल्यानंतरही मोदींना गहिवरुन आल्याचं दिसून आलं.
आपली राजमुद्रा चंद्रावर
"तुमच्या परिश्रमांना सॅल्यूट, तुमच्या धैर्याला सॅल्यूट, तुमच्या एकाग्रतेला सॅल्यूट. तुम्ही देशाला ज्या उंचीवर घेऊन गेला आहात ते पाहिल्यास ही काही साधं यश नाही. अनंत अंतराळामध्ये भारतीय वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद आहे," असं म्हणाले. "इंडिया इज ऑन द मून" असं मोदींनी हात वर करुन म्हटलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. "आपली राजमुद्रा आज चंद्रावर आहे. आपण तिथे पोहोचलो आहोत जिथे अजून कोणीही पोहोचलेलं नाही. आपण असं काम केलं आहे जे आधी कोणीच केलेलं नाही. हा आजचा भारत आहे. निर्भय भारत आणि संघर्ष करणारा भारत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रत्येक भारतीयला परीक्षा उत्तीर्ण झाल्यासारखं वाटलं
"हा तो भारत आहे जो नवीन विचार करतो आणि नवीन पद्धतीने विचार करतो. जो डार्क झोनमध्ये जाऊनही जगात प्रकाशाची किरणं निर्माण करतो. 21 व्या शतकामध्ये हाच भारत जगातील वेगवेगळ्या समस्या सोडवेल," असंही पंतप्रधानांनी म्हटलं. "माझ्या डोळ्यांसमोर 23 ऑगस्टच्या दिवसाचा एक एक संकेद समोर फिरतोय. टचडाऊन झाल्यानंतर इस्रो सेंटर आणि संपूर्ण देशात लोकांनी जल्लोष केला. ही दृष्य कोण विसारले. या स्मृती अमर होतात. असे क्षण अमर होतात. या शतकातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीयाला हा आपला विजय वाटत आहे. प्रत्येक भारतीयाला वाटत आहे की तो एखाद्या मोठ्या परिक्षेत उत्तीर्ण झाला आहे. आजही शुभेच्छा दिल्या जात आहेत. हे सारं शक्य झालं आहे तुमच्या सर्वांमुळे. माझ्या देशातील वैज्ञानिकांनी हे करुन दाखवलं आहे. मी तुमचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे," असं मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं.