जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश, मोदींची `मन की बात`
भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ७० व्या स्वातंत्र्य दिनाआधी मन की बातमधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी जीएसटी लागू होणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलंय.
जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाले असून ग्राहकांचा व्यापा-यांवरील विश्वास वाढल्याचं मोदींनी सांगितलं. गुजरातसह देशभरातील काही राज्यातील पूरस्थितीवरही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केलीय.
पर्यावरणातील बदलांमुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचं सांगत पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्यात जवानांनी स्वतःला झोकून दिल्याचं मोदींनी म्हटलंय. याशिवाय ७० वा स्वातंत्र्यदिन, 1942 चे चले जाव आंदोलन याचाही उल्लेख मोदींनी केला.
महिला वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करणा-या मिथाली राजच्या महिला क्रिकेट टीमचंही मोदींनी खास अभिनंदन केलं. रक्षाबंधनला हँडमेड राखी वापरा आणि गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करा असं आवाहनही मोदींनी केलं.