Viral Photo : सोशल मीडियावर (Social Media) आता लोकांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरुय याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याची बरीच इच्छा असते. मात्र अशीच घरातील काही खासगी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एका पोलीस अधिकाऱ्याला (UP Police) चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर बुधवारपासून एक फोट व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका बेडवर पाचशेच्या नोटांसोबतचा मुलांचा सेल्फी व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा सेल्फी ज्या घरातून काढला आहे ते एका पोलीस अधिकाऱ्याचे घर असल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरे तर, उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून समोर आलेल्या या सेल्फीने खळबळ उडवून दिली आहे. व्हायरल होत असलेल्या सेल्फीमध्ये दोन मुले आणि एक महिला बेडवर त्यांच्यासमोर पैशांचा ढीग घेऊन बसलेले दिसत आहेत. सेल्फीमध्ये 500 च्या नोटांचे सुमारे 27 बंडल बेडवर अतिशय व्यवस्थितपणे मांडण्यात आले आहेत. मात्र मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या या फोटोसेशने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सेल्फीमध्ये दिसणारी ही मुलं एका पोलीस अधिकाऱ्याची आहेत.


उन्नाव जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस प्रमुखाच्या मुलांचा लाखो रुपयांसह फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा सुरु आहे. या फोटोत पोलीस स्टेशन प्रमुखाची दोन मुले आणि त्यांची पत्नी सुमारे 14 लाख रुपये घेऊन पोज देताना दिसत आहेत. हा फोटो व्हायरल होताच उन्नावच्या पोलीस विभागापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच याबाबत शंका उपस्थित केली आहे. पोलीस अधिकाऱ्याकडे एवढे पैसे कुठून आले? असा प्रश्न आता विचारला जात आहे.


गुरुवारी हा फोटो व्हायरल होताच उन्नाव जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी तात्काळ या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. फोटो व्हायरल होताच ठाणे प्रमुखाने पोलीस ठाण्यात हजेरी लावत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. हा फोटो पोलिस अधिकारी रमेश साहनी यांच्या घरातील आहे. याबाबत खुलासा करताना साहनी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कुटुंबातील एक मालमत्ता विकली होती आणि त्याचे हे सर्व पैसे आहेत. हे सगळे पैसे आमचेच आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हा फोटो हा 14 नोव्हेंबर 2021 चा आहे आणि तो आता कसा व्हायरल झाला याबाबत माहिती नाही, असेही साहनी म्हणाले.


दरम्यान, व्हायरल सेल्फी प्रामुख्याने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन सर्वात लोकप्रिय सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत होती. पोलीस अधिकाऱ्याच्या घरात एवढी रक्कम कशी आली अशीच चर्चा सगळीकडे सुरु होती. लोक मध्यम दर्जाचा पोलीस अधिकारी एवढी मोठी रक्कम कशी कमवू शकतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे उन्नाव पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.