भारताचा विजय साजरा केला म्हणून पोलिसांनी तरुणांचं मुंडन करत परेड काढली; कारण वाचून म्हणाल 'हे तर...'

व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) पोलीस तरुणांचं मुंडन करत त्यांची परेड काढताना दिसत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 12, 2025, 08:29 AM IST
भारताचा विजय साजरा केला म्हणून पोलिसांनी तरुणांचं मुंडन करत परेड काढली; कारण वाचून म्हणाल 'हे तर...'

भारतीय संघाने चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकल्यानंतर रविवारी रात्री अती उत्साहात विजय साजरा केल्याबद्दल मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील पोलिसांनी तरुणांच्या शिक्षा केली. प्रकरणाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर दोघांविरुद्ध कडक राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला आहे. एनएसए अंतर्गत एखाद्या व्यक्तीला 12  महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येते.

पोलिसांनी तरुणांनी रात्री उशिरा केलेल्या अतीउत्साही विजयोत्सवासाठी त्यांचं मुंडन केले आणि  रस्त्यांवर फिरवले. सोमवारी पोलीस मुंडन केलेल्या तरुणांना घेऊन जात असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या वादामुळे भाजप आमदार गायत्री राजे पुर यांनी मंगळवारी देवासचे पोलिस अधीक्षक (एसपी) पुनीत गेहलोत यांची भेट घेतली.

"हे तरुण देशाच्या इतर भागांप्रमाणेच भारताच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. ते नियमित गुन्हेगार नाहीत आणि अशा प्रकारे त्यांची सार्वजनिकरित्या परेड करणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. त्यांचे कुटुंबीय माझ्यासोबत एसपीच्या कार्यालयात गेले होते, जिथे आम्ही या अयोग्य शिक्षेचा तीव्र निषेध केला. एसपींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे," अशी माहिती गायत्री राजे पूर यांनी दिली आहे. 

रविवारी रात्री करण्यात आलेलं सेलिब्रेशन आणि सोमवारच्या घटनाक्रमाची चौकशी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती अशोक गहलोत यांनी दिली आहे. "तपासात सर्व पैलू तपासले जातील, ज्यात अटक केलेले लोक प्रत्यक्षात सहभागी होते का याचाही समावेश आहे. अतिरिक्त एसपी जयवीर सिंग भदोरिया यांना कालबद्ध चौकशी करण्याचे काम देण्यात आले आहे, जी सात दिवसांत पूर्ण केली जाईल. जबाबदार आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल," असं ते म्हणाले आहेत.

दुबईमध्ये भारताच्या विजयानंतर देवासमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेल्या सेलिब्रेशनमधून हा वाद निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन प्रभारी अजय सिंग गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सयाजी गेटजवळ काही तरुणांना धोकादायकपणे फटाके फोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा हाणामारी झाली. व्हिडिओमध्ये तरुणांचा एक गट अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याचं दिसून आलं आहे, ज्यामुळे त्यांना कारवाई करावी लागली. काही तरुण पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करताना आणि त्यावर दगडफेक करतानाही दिसले. 

या फुटेजच्या आधारे पोलिसांनी 10 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, काही जणांचे मुंडन जबरदस्तीने करून पोलिस स्टेशनपासून सयाजी गेटपर्यंत परेड काढल्याचे व्हिडिओ समोर आले.