ओमायक्रॉनचा धोका : आता या शहरात जमावबंदी, या नियमांचे पालन मस्ट

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यक्तींची उपस्थिती कोविड प्रोटोकॉल अंतर्गत असावी.  तसेच कोविड हेल्प डेस्क तयार करणे आवश्यक असेल.

Updated: Dec 8, 2021, 10:02 AM IST
ओमायक्रॉनचा धोका : आता या शहरात जमावबंदी, या नियमांचे पालन मस्ट
संग्रहित छाया

लखनऊ : Omicron News : कोरोनाचा उद्रेक कमी होत असतानाच आता ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. देशात ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारशिवाय राज्यांनीही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनेक शहरांमध्ये कोविड-19चे निर्बंध वाढवण्यात आले आहेत. याचा भाग म्हणून उत्तर प्रदेश सरकारनेही मोठे पाऊल उचलले आहे. राजधानी लखनऊमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे येथे जमाव करता येणार नाही. जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मास्क घालणे अनिवार्य

ख्रिसमस, 31 डिसेंबर आणि लखनऊमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान, कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे, मास्क घालणे आणि दोन यार्ड अर्थात सहा फुटाचे अंतर पाळणे बंधनकारक असेल. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात पोलिसांनी म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अंतर्गत लखनऊमध्ये 5 जानेवारी 2022 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त डी. के. ठाकूर म्हणाले की, सरकारने लागू केलेल्या कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. यादरम्यान विधानभवनाच्या परिसरात आणि एक किलोमीटरच्या परिघात विशेष दक्षता राहणार आहे.

विधानभवनाबाहेर सुरक्षा वाढवली

नवीन नियमांनुसार परिसरात ऊस, टांगा, फटाके, ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास बंदी असेल. त्याचवेळी सायबर क्राईम सेल ऑनलाइन हालचालींवर बारीक नजर ठेवणार आहे. ऑनलाइन अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यक्तींची उपस्थिती कोविड प्रोटोकॉल अंतर्गत बंद ठिकाणी एका वेळी जास्तीत जास्त 100 असेल. कोविड हेल्प डेस्क तयार करणे आवश्यक असेल.
 
याशिवाय यूपीएससी आणि पीएससी परीक्षांपासून कोणत्याही प्रकारच्या सरकारी परीक्षांसाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेतील कॉपीला आळा घालण्याच्या उद्देशाने कोणत्याही असामाजिक घटकाला केंद्राभोवती फिरू दिले जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लखनऊ पोलीस सज्ज झाले आहेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंचा धोका

भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकारांची 22 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि अशा परिस्थितीत अधिक दक्षता घेतली जात आहे. याशिवाय जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली असून सरकार या नवीन व्हेरिएंबाबत अधिक काळजी घेत आहे.