शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि भारत-पे कंपनीचे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणत्याही मुद्द्यावर ते परखड आणि रोखठोक मत मांडत असतात. पण यामुळेच ते अनेकदा वादातही अडकत असतात. नुकतंच त्यांनी आपल्या एका विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. आपली नाराजी जाहीर करताना ते काही असं काही बोलून गेले आहेत की, पोस्ट व्हायरल झाली आहे. अशनीर ग्रोव्हर यांना प्राप्तिकर विभागाने पाठवलेली नोटीस शेअर करत नाराजी जाहीर केली होती. 


एक्स पोस्टमध्ये शेअर केला नोटीसचा फोटो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशनीर ग्रोव्हर यांनी मंगळवारी प्राप्तिकर विभागाने पाठवलेली नोटीस शेअर करत त्यामागील उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ही नोटीस सकाळी 8 वाजता पाठवण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनी उत्तर देण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी नोटीशीचा फोटो एक्सवर शेअर केला होता. 'टॅक्स दहशतवाद की सूड? तुम्हीच निवडा' असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. 


अशनीर ग्रोव्हर पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत?


अशनीर ग्रोव्हर आपल्या पोस्टमध्ये असं काही म्हणाले आहेत, ज्यामुळे ती व्हायरल झाली आहे. "टॅक्स दहशतवाद की सूड? तुम्हीच निवडा. सकाळी 8 वाजता आयटी नोटीस मिळाली आणि उद्या 12.28 पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. चला मित्रांनो आता तर गोष्टी खऱ्या वाटतील यासाठीही प्रयत्न केले जात नाही आहेत. थेट गोळीच घाला". 



विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आयकर विभाग आणि मंत्रालयाला टॅग केलं आहे. 


व्हायरल झाल्यानंतर पोस्ट केली डिलीट


अशनीर ग्रोव्हर यांची पोस्ट वेगाने व्हायरल होत होती. यानंतर मात्र अशनीर ग्रोव्हर यांनी पोस्ट डिलीट केली. ही पोस्ट डिलीट करण्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केलं नाही. पण ही पोस्ट डिलीट करण्याआधी जवळपास 80 हजार व्ह्यू मिळाले होते. तर एक हजारहून अधिक युजर्सनी लाईक केलं होतं. 


अशनीर ग्रोव्हर यांनी कर धोरणावरुन याआधीही उघडपणे नाराजी जाहीर केली आहे. कर भरण्याची तुलना त्यांनी शिक्षेशी केली होती. भारतात असमान कर प्रणाली आहे आणि सरकार आमच्या उत्पन्नाच्या 30-40 टक्के कोणत्याही ठोस लाभाशिवाय घेते असा आरोप त्यांनी केला होता. 


भारतातील करदाते चॅरिटी करत असून, त्यांना कोणताही फायदा मिळत नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं होतं की, मी 10 रुपये कमावल्यानंतर सरकार 4 रुपये ठेवून घेणार. म्हणजे 12 महिन्यांपैकी 5 महिने आपण फक्त सरकारसाठी काम करतो.