Viral News India : अनेकदा कारमध्ये लहान मुळं खेळताना दिसतात. किंवा काही कामासाठी मोठी मंडळी काही क्षण कारमधून निघून गेली तरीही ही लहानगी मुलं कारमध्येच बसलेली असतात. मात्र अशा वेळी नेमका किती मोठा धोका आणि संकट ओढावलं जाऊ शकतं याची अनेकांनाच कल्पना नसते. तेलंगणा इथं घडलेल्या या प्रकारानं याची कल्पना आली असून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
तेलंगणा येथील रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये ही मन विषण्ण करणारी य़घटना घडली असून, इथं चेवेल्लामध्ये एका बंद कारमध्ये अडकल्यानं दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार गुदमरल्यामुळं या मुलींचा मृत्यू ओढावला.
अभिनया श्री (4 वर्षे) तन्मयी श्री (5 वर्षे) अशी या मुलींची नावं असून, त्या चुलत बहिणी असल्याचं सांगण्यात येतं. या दोघीही खेळता खेळता शेजाऱ्यांच्या बंद कारमध्ये गेल्या आणि तिथंच कारचे दार लॉक झाले. दरवाजा उघडता न आल्यानं या दोघीसुद्धा कारमध्ये अडकल्या आणि तिथंच त्यांचा श्वास गुदमरला.
पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली त्यांच्या आई- वडिलांसमवेत आजी- आजोबांच्या घरी आल्या होत्या, जिथं त्यांच्या काकांसाठी लग्नकरता एक स्थळ येणार होतं. घरात पाहुण्यांची ये-जा होती, येणाऱ्यांसाठी सारे स्वागताची तयारी करत होते तर या दोन्ही मुली खेळण्यात व्यग्र होत्या.
चेवेल्ला पोलिसांच्या माहितीनुसार दुपारी साधारण 1.30 वाजण्याच्या सुमारास लहान मुलं घराबाहेर खेळत होती, तर घरातील बाकी मंडळी आतमध्ये होती. खेळता खेळता या मुली घरासमोर असणाऱ्या कारमध्ये गेल्या. तिथं शिरताच कारची दारं बंद झाली आणि त्या आतून मदतीसाठी आरडाओरडा करत राहिल्या, मात्र मुलींचा टाहो कोणाच्याही कानी पडला नाही. जवळपास तासाभरानंतर जेव्हा मुली कुठे नाहीत हे लक्षात आलं तेव्हा पालकांनी त्यांना हाका मारण्यास सुरुवात केली.
कोणतंही उत्तर मिळत नाही हे लक्षात येताच पालकांनी मुलींची शोधाशोध सुरू केली आणि शक्य त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर कारकडे त्यांचं लक्ष गेलं आणि मुली कारमध्ये निपचित पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कुटुंबीयांनी तातडीनं कारचं दार उघडलं आणि या मुलींना स्थानिक रुग्णालयात नेलं मात्र त्याआधीच मुलींचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. कुटुंबीयांनी सदर प्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्य़ास नकार देत हा मुद्दा इथंच थांबवण्याचा निर्णय घेतला.