बापरे! राजभवनात चोरी, चार महत्त्वाच्या हार्ड डीस्क गायब; हेल्मेट घालून आलेला चोर... घटनाक्रम वाचून 'जत्रा' सिनेमातला सीन आठवेल

Theft at Raj Bhavan: आजवर अनेक चित्रपटांमध्ये चोरीच्या घटनांवर उजेड टाकत तसे सीन साकारण्यात आले आहेत. पण, प्रत्यक्षात एखाद्या चित्रपटाच्या सीननुसारच चोरी झाल्याचं पाहिलं आहे?   

सायली पाटील | Updated: May 20, 2025, 11:51 AM IST
बापरे! राजभवनात चोरी, चार महत्त्वाच्या हार्ड डीस्क गायब; हेल्मेट घालून आलेला चोर... घटनाक्रम वाचून 'जत्रा' सिनेमातला सीन आठवेल
shocking telangana raj bhavan 4 hard disk stolen from sudharma bhavan cctv footage went viral

Theft at Raj Bhavan: अनेक राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान असणाऱ्या राजभवन या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त असतं. राज्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती, कायदपत्र आणि इतक अनेक संदर्भांची साठवणही या वास्तूमध्ये अतिशय काळजीपूर्वतरित्या केली जाते. मात्र, सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही राजभवनच सुरक्षित नसल्याची बाब आता खळबळजनकरित्या समोर आली आहे. कारण ठरतंय ती म्हणजे तिथं झालेली फिल्मी स्टाईल चोरी. 

'जत्रा' सिनेमातील हेल्मेट घालून बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांचा तो सीन लक्षात आहे का? अशीच काहीशी चोरी राजभवनात झाली असून, चोर चक्क हेल्मेट घालून आल्याचं पाहायला मिळालं. तेलंगणातील राजभवनात घडलेल्या या घटनेमुळं यंत्रणांनाही धक्का बसला आहे. तेलंगणा राजभवनात असणाऱ्या सुधर्मा भवनातील पहिल्या मजल्यावरील एका दालनातून चार हार्ड डीस्क चोरीला गेल्या आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार 14 मे 2025 रोजी ही घटना घडली आणि आता उघडकीस आली. यामध्ये चोरानं हेल्मेट घालून तो संगणक कक्षात आला आणि तिथं त्यानं हार्ड डिस्क पळवल्या. चोरीला गेलेल्या या हार्ड डीस्कमध्ये महत्त्वाची माहिती, फाईल आणि कैक अहवाल असून यामुळं आता अतिशय गोपनीय माहिती चोरांच्या हाती आहे हीच वस्तूस्थिती समोर आल्यानं राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत. 

सीटीटीव्हा फूटेजमध्ये स्पष्ट दिसतोय चोर... 

राजभवन कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित चोराची माहिती दिली आहे. या फूटेजमध्ये एक हेल्मेट घातलेली व्यक्ती खोलीत येऊन कालांतरानं हार्ड डीस्क घेऊन पळ काढताना दिसत आहे. सदर घटना लक्षात येताच राजभवन कर्मचाऱ्यांनी तातडीनं पंजागुट्टा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली, ज्यानंतर आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत. 

तेलंगणा राजभवन हे तेथील राज्यपालांचं शासकीय निवासस्थान आणि त्यांचं कार्यालय असून, तिथं सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहेत. पण, यातूनही वाट काढत हा चोर इतक्या आतपर्यंत शिरला कसा हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.